बहुजनवाद या संकल्पनेची वैचारिक मांडणी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक या चळवळीपासून सुरू झाली. ब्राह्मणेतर चळवळीत राजकीय सत्ता केंद्रे महत्त्वाची बनू लागल्याने आलो-वर्ण-स्रीदास्य अंताचा आग्रह धरणारा सत्यशोधकी विचार मागे पडला. सामाजिक जडणघडणीचा परिणाम म्हणून सर्व क्षेत्रात ब्राह्मणांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. ब्राह्मणेतर चळवळीत सर्व क्षेत्रात ब्राह्मणविरोध हा संदर्भ केंद्रस्थानी आला. डॉ. आंबेडकरांनी या टप्यावर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र चळवळ उभी करून आंबेडकरी चळवळीचा स्वतंत्र प्रवाह विकसित केला. १८८५ साली स्थापन झालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उच्चवर्णीयांची मानली जात होती. महात्मा गांधीचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाल्यावर काँग्रेसला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त झाले. काँग्रेसच्या या बदलत्या धोरणाला प्रतिसाद देताना ब्राह्मणेतर चळवळीतील मुख्य प्रवाह कॉंग्रेस पक्षात विलीन झाला. भारतीय राजकारणात काँग्रेस हा मुख्य प्रवाह होता. स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस पक्षाने सर्वसमावेशक भूमिका घेऊन विकास आणि लोककल्याण या मुद्याच्या आधारे राजकारण करण्याची व्युव्हरचना आखली. मात्र भारतीय राजकारणात जात हे समाजवास्तव लक्षात घेऊन राजकारण करण्यात स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या टप्प्यावर प्रतिष्ठा नव्हती. प्रत्यक्ष व राजकारणात बहुसंख्याकता महत्त्वाची असल्याने व्यापक मुद्याच्या नावाखाली पण जातीच्या आधारेच राजकारण करण्याची प्रवृत्ती साकारली. राज्यांराज्यामधील उच्च जातींनी कनिष्ठ व मध्यम जातीच्या आधारे समीकरणे तयार करून राज्यांमधील विविध सत्ता केंद्रावर आपले वर्चस प्रस्थापित केले.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : बहुजन महासंघ : निवडणुका आणि राजकारण