नमस्कार ! कविता एक असं माध्यम... ज्यातून कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. एखादी भावना, घटना, स्थिती या सर्वांना कविता स्वतः मध्ये गुंफुन घेते आणि एक कलाविष्कार उदयास येतो. कॉलेज जीवनापासून मी काव्यलेखन करतोय. त्या वेळी होणाऱ्या काव्य वाचनांच्या स्पर्धांमधून सहभाग नोंदवत होतो. त्यानंतर २०१५ मध्ये डीवायएसपी या पदावर रुजू झालो आणि कामात व्यस्त होत गेलो. या सर्व काळात एका गोष्टीने माझी सोबत केली ती म्हणजे माझी कविता. मी ज्या गोष्टी पाहात गेलो, अनुभवत गेलो त्या कवितांमधून मांडत राहिलो. बऱ्याच वेळा आपण एखादी कलाकृती घडवतो, मनातील ही जडणघडण कागदावरही उतरवतो परंतु तिला लोकांपर्यंत पोहोचवत नाही.. तसेच काहीसे माझ्या बाबतीतही झाले. माझ्या कवितांचा वाचकवर्ग म्हणजे माझे जवळचे लोक, माझे मित्र असा राहिलेला आहे. त्यांच्या प्रतिक्रियांमधून कविता लेखनास नेहमीच हुरूप मिळत राहिलेला आहे. तरीही आपली कविता अधिक लोकांनी ऐकावी, तिच्याविषयीची मते, तिचं परिक्षण व्हावं आणि लोकांना ती किती भावतेय, आपलीशी करतेय याची पडताळणी व्हावी असं वाटत होतं. यातूनच मग कविता प्रकाशित करण्याचा विचार माझ्या मनांत आला. अव्यक्तांच्या कविता हा माझा पहिला काव्यसंग्रह आहे. यांतील भावना या गत ५ वर्षांमध्ये पाहिलेल्या आहेत. ज्या गोष्टींनी मनात घर केले, आनंद निर्माण केला, काहूर माजवले अशा सर्व गोष्टीच्या साक्षीदार या कविता आहेत. ज्या भावना ओठांवर येतात पण त्या बोलल्या जात नाहीत. ज्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात पण त्या कधी व्यक्त होत नाहीत अशा अव्यक्त भावना या कवितांमधून मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. राग, चीड, प्रेम, यातना, सहानुभूती अशा भावनांची अनुभूति या कविता वाचकांना देतील. अशा या अव्यक्तांच्या कविता आपल्यालाही नक्कीच आपलेसे करतील अशी आशा आहे. धन्यवाद !!
-समीरसिंह द्वारकोजीराव साळवे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अव्यक्तांच्या कविता