कोणताही महान माणूस परिस्थितीचं अपत्य असतो, परिस्थितीच त्याला जन्माला घालते. त्याला घडवते आणि महान माणूस स्वतला हवी तशी परिस्थिती घडवतो किंवा त्यासाठी अथकपणे प्रयत्न करतो. संघर्ष करतो, बदलासाठी हा संघर्ष असतो. काय बदलायचं आहे आणि काय नवीन निर्माण करायचं, ते कोढून आणायचं आणि रुजवायचं यासाठी हा माणूस संघर्ष करतो. त्यासाठी तो वेगवेगळी आयुधं वापरत असतो. रस्त्यावरच्या संघर्षापासून ते लेखनापर्यंत, नव्या परंपरा आणि नव्या विचारांपासून ते प्रबोधनापर्यंत अनेक आयुधं असतात. ती तो वापरतो. या माणसाला समजावून घ्यायचं असेल तर तो ज्या परिस्थितीत, ज्या समाजात, ज्या पर्यावरणात जन्माला आला ते सर्व पहावं लागतं. साहित्याच्या बाबतीत तर ते पहावंच लागतं. संबंधित माणसाची नाळ कोठं पुरली ती जागा, तेथील माती, तेथील समाजव्यवस्था, तेथील धर्मव्यवस्था इथपर्यंत धांडोळा करावा लागतो. साहित्य हे समाजाचं, माणसाच्या जगण्याचं, त्यानी पाहिलेल्या स्वप्नांचं प्रतिबिंब असतं हे मान्य केल्यास या सर्व गोष्टी ओघानंच येतात. त्यांना चकवा देऊन पुढे गेल्यास महामाणूस, महान लेखक समजावून घेण्यात अडचणी येतात. त्याचं कर्तृत्व पाहता येतं. त्याचा फोटो काढता येतो पण त्याच्या कर्तृत्वाला कोणत्या मुळांनी, कोणतं खतपाणी दिलं, कोणती जीवनसत्वे आणि कोणती संघर्षतत्वं का आणि कशी दिली हे पहायचं राहूनच जातं. एकूणच माणूस आणि त्याचं कर्तृत्वही समजून घेण्यात अडचणी येतात. म्हणजे एका अर्थानं आपण त्याच्यावर अन्याय करतो. दृश्याचं आकलन, अध्ययन करणं जसं महत्त्वाचं असतं तसं दृश्य जन्माला घालणाऱ्या गर्भाशयाचं आकलनही महत्त्वाचं ठरतं.....(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : कॉम्रेड अण्णा भाऊ साठे