लहू कानडे हे मराठी जनतेला एक प्रतिभासंपन्न कवी, महाराष्ट्राच्या ग्रामविकासाला हागंदारीमुक्त गावाची संकल्पना देऊन ती राबविणारा एक कार्यक्षम अधिकारी म्हणून आणि विविध सहकारी संस्था स्थापन करून तळागातील जनतेचे प्रश्न सोडविणारा एक कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. ‘आम्ही हिंदुस्थानी’ या ग्रंथाच्या लेखनाने एक निबंधकार म्हणून आणि एक विचारवंत म्हणून त्यांचे नवे रूप मराठी जनतेसमोर येत आहे याचा मनस्वी आनंद वाटतो. ग्रामविकासात विविध जिल्हा परिषदांच्या माध्यमातून एक अधिकारी म्हणून त्यांनी सर्वसामान्य जनतेशी बांधीलकी मानून केलेले काम इतके महत्त्वाचे आहे की ते प्रशासकीय सेवेत येणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांना अनुकरणीय ठरावे. त्यांच्या या ग्रंथात त्यांनी समाजजीवनाच्या सर्वांगांचा किती सखोल आणि गांभीर्याने अभ्यास केला आहे याची साक्ष पटते. त्यात साहित्य, राजकारण, मजुरांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, जागृत होत असलेल्या स्त्रीशक्तीचे महत्त्व इ. अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे. या सर्व लेखनाचा उद्देश समाजजागृती व्हावी, सामान्य माणसाला शासन कसे चालते याची समज यावी आणि त्यांना आत्मभान यावे हा आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेली लोकशाही यशस्वी व्हावयाची असेल तर तळागाळातील माणूस आणि स्त्री अधिक जागृत होणे आणि त्यांना स्वावलंबी जीवन जगता येणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणती धोरणे आखली जावीत आणि त्यांची अंमलबजावणी शासकीय यंत्रणेमार्फत कशी व्हावी याची काही सूत्रे त्यांनी या ग्रंथात मांडलेली आहेत. जनतेच्या संवादाची आणि प्रदीर्घ शासकीय सेवेतील अनुभवाची पार्श्वभूमी असल्यानेच ते हे सर्वसामान्य जनतेला उपयुक्त ठरेल असे लेखन करू शकले.....(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आम्ही हिंदुस्थानी