कवी महेंद्रकुमार मेश्राम यांच्या उद्ध्वस्त माणसाच्या कविता’ या कवितासंग्रहातील कविता माणुसकीच्या उजेडाची उत्कट तहान लागलेल्या कविता आहेत म्हणूनच महेंद्रकुमार कविता लिहितात या सर्जनशील घटनेचे मी मनःपूर्वक अभिनंदनही करतो आणि उद्ध्वस्त माणसाच्या कविता या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांना मी हार्दिक सदिच्छाही देतो. आंबेडकरी चळवळीच्या पोटी कवी महेंद्रकुमार मेश्राम यांचा जन्म झाला. आंबेडकरी चळवळीच्या त्यावेळच्या निखाऱ्यांच्या वावरातच हे कवितेचे झाड वाढले. ढगांमधून पाणी उगवावे तसे भोवतीच्या पेटलेल्या काळातून कवी महेंद्रकुमार उगवले. ज्यांना उगवायचे नसते त्यांच्यासाठी कुठेही आणि कोणतेही क्षितिज अस्तित्वात नसते. ज्यांना उगवायचे असते त्यांच्यासाठी मात्र क्षितिज स्वतःची सतत नवनवी रचना करते. मला महेंद्रकुमार त्यामुळेच भर उन्हाळ्यात ज्वालांचे शेले पांघरणाच्या गुलमोहोरासारखे वाटतात. आंबेडकरवादी कवींची अख्खी कविता अशीच आहे. गुलमोहोरासारखी ही कविताही लोकांच्या काळजावर ज्वालांची उत्कट फुले उधळते.
- डॉ. यशवंत मनोहर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : उद्ध्वस्त माणसाच्या कविता