मैफलीत बसून कविता ऐकण्याला वेळ नाही किंवा कविता संग्रह विकत घेऊन वाचायलाही वेळ नाही पण ती गरज मोबाईल फोनच्या व्हॉटसअपवर किंवा फेसबुकवर भागविण्याच्या या जमान्यात कविता संग्रह प्रकाशित करणे योग्य आहे काय? हा प्रश्न माझ्यासमोर होता. परंतु तरीसुद्धा कविता संग्रह काढण्याचे धाडस मी केले. वाचायला लागल्यापासून डिटेक्टिव्ह कथा-कादंबऱ्या वाचण्यात रमलेलो असताना कवितेपर्यंत पोहचणे कठीणच मात्र हिंदी चित्रपट गीतांच्या आवडीमुळे चित्रपटातल्या गाण्यांची पुस्तके वाचताना कविता वाचण्याशी संबंध आला. मात्र मराठी कविता म्हणजे काय, काव्य वाचन काय असते हे चळवळीतील प्राथमिक अभ्यासवर्गात कळले.
विद्यार्थीदशेत असताना आम्हाला चळवळीकडे वळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रा. रणजित परदेशी यांनी जे शाळाबाह्य वर्ग घेतले त्यातून खऱ्या अर्थाने साहित्य नावाच्या विषयाकडे बघण्याची दृष्टी मिळाली. मी लिहायला लागलो पण मांडत नव्हतो. मात्र माझा हक्काचा श्रोता म्हणजे माझी मैत्रीण आणि बायको सुवर्णा. पण ती साहित्याची विद्यार्थिनी आणि तिचे वाचनही दांडगे असल्यामुळे मी माझी कविता सार्वजनिकरित्या मांडावी असे तिला वाटत नव्हते. अर्थातच माझ्या मांडणीत दृष्टिकोन असावा आणि तो मी मिळवावा असे तिला वाटत होते. मी मात्र लिहित राहिलो, जमेल तेव्हा आणि जमेल तसे. आदिवासी विकास विभागातल्या सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना चालविण्याच्या गरजेतून सुरु केलेले नवा प्रस्ताव हे मासिक मी आणि सुवर्णाने सात वर्ष चालवले. सरकारी नोकरीतून बाहेर पडल्यानंतर फुले पर्व हे मासिक चार वर्ष चालवले. त्यातून लिहित गेलो. मात्र व्यवस्थेकडे बघण्याची दृष्टी मिळाली ती प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांच्या अभ्यास वर्गातून.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जगणे शोधीत होतो