डॉ. संजय गायकवाड यांनी लिहिलेला `मार्क्स-आंबेडकर समन्वयी परिप्रेक्ष्यातून शिक्षण आणि रोजगार` हा ग्रंथ वाचकांच्या हाती येत आहे ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. कॉ. शरद पाटील आणि रावसाहेब कसबे यांनी मार्क्स आणि आंबेडकर यांचा वैचारिक-समन्वय सिद्धांत मांडला. डॉ. कसबे यांचा मित्र असल्याने व शेजारी असल्याने त्या काळात त्यांच्या विचारमंथनाच्या प्रक्रियेचा मी साक्षीदार आहे. नवविचारांचे स्वागत दुहेरी पद्धतीने होते. तसे होणे अपरिहार्य असते आणि आवश्यकही असते. त्याशिवाय सैद्धांतिक बैठक दृढमूल होत नाही. प्रा. गायकवाड यांनी मार्क्स आणि आंबेडकर यांच्या वैचारिक समन्वयातून शिक्षण आणि रोजगार यांची चर्चा कशी करता येईल याविषयी महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. सामाजिक गतिशीलतेला सुरवातीचे प्रेरक म्हणून चेतना देण्याचे ऐतिहासिक कार्य शिक्षणाने प्रत्येक समाजव्यवस्थेत केले आहे. हे प्रेरक बहुआयामी असते. एकाच वेळी समाजातील जुनी मूल्ये आणि प्रमाणे उद्ध्वस्त करण्याचे ते कार्य करते तर त्याबरोबरच नव्या मूल्य-प्रमाणांचे बीजारोपण करीत समाजात वैचारिक पोकळी निर्माण होऊ देत नाही. शिक्षणाचे संदर्भही स्थल-काल सापेक्ष असतात. मात्र त्यातील गाभ्याचे (Sprit) उद्दिष्ट सारखे असण्यास प्रत्यवाय नसावा.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मार्क्स-आंबेडकर समन्वयी परिप्रेक्ष्यातून शिक्षण आणि रोजगार