कविता, भावना आणि शब्द यांचे नाते काय आहे, याचे नेमके आकलन माधुरी मरकड यांना आहे. शब्दांवर भावनांचे आणि आवाजाचेही वजन ठेवावे लागते, हे त्यांना नेमके कळले आहे, कारण आपणच दिलेल्या शब्दांना जागताना आपणच गोत्यात येऊ शकतो, याचे भान या कवीला आणि त्यांच्या कवितेला आहे. काळाच्या लेपनाने जखमा भरल्या तरी व्रण कायमचे राहतात, हे त्यांना माहीत आहे. म्हणून मनाच्या गाभाऱ्यात उतरण्याच्या शब्दांची अपेक्षा ही कविता करते आहे. ही कविता मैत्रीचा, विश्वासाचा, नात्यांच्या बांधिलकीचा उत्सव साजरा करताना सतत सावधही असलेली दिसते. शब्दांचे टकराव होतात तेव्हा माणसं कळत जातात, याचे भान ही कविता बाळगते. म्हणूनच संवादाचे हात पुढे करताना मोकळिकीचा आणि लवचिकतेचा सहवास अपेक्षित करते. त्यामुळे हा संवाद केवळ दोघांमधला नाही तर हा संवाद समग्र व्यवस्थेतला आहे. तसा संवाद माधुरी मरकड यांना हवा आहे. त्यात विश्वास असावा. जात-धर्म-पंथ नसावा. खुल्या अवकाशातले बांधिलकीचे क्षण असावेत, असा आशावाद व्यक्त करणारी ही कविता बापापासून सैनिकांपर्यंत बोलायला लागते. विठ्ठलापासून सावित्रीपर्यंत ती संवाद साधते.
कविता म्हणजे रक्तातील चढ-उतार असतात. त्वचेसारखी ती अंगांगात भिनून राहिली आहे. कविता तिला जपताना स्वतःलाही आवर घालते. कागदावर उतरताना तिला मुक्त वाट करून देते. कवितेचे आणि कवीचे नाते काय असते हे माधुरी मरकड यांनी नेमकेपणाने पकडले आहे. कवितेची डायरी उशाला घेऊन झोपणारी ही स्त्रीकवी कविता आणि कवी यांचे नाते देहमनाचे असल्याचे सांगते. कविताच तिला प्रश्न विचारते. तिला विचारायला आणि विचार करायला भाग पाडते. कवितेसोबत थकून झोपी गेलेली कवी सकाळचा भलामोठा सूर्य पाहून पुन्हा स्वप्नांचे ढाळसते बुरूज बांधायला सुरुवात करते. म्हणजे रोज कविता कवीला जगण्याचे बळ पुरवते......(प्रस्तावनेतून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : रिंगण (कवितासंग्रह)