मानवाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्याचे कलाविश्वही विकसित होत जाते आणि विकसित कलाच कित्येकदा समाजाला बोट धरून पुढे नेते. कला कोणतीही असो ती सभोवतीच्या वातावरणातून, माणसाच्या भावविश्वातून व कलावंताच्या कल्पकतेतून जन्म घेते, कलेचा वेलू कितीही मोठा झाला. गगनावरी गेला तरी त्याची मुळं मातीशी, मानवी सुखदुःखांशी जुळलेली असावी, तेव्हाच कलेचे योग्य भरणपोषण होऊन कलेची कलात्मकता व महत्ता वाढते. जी कला मातीपासून दुरावते, माणसाशी नाते तोडते ती कला निःसत्व, निष्प्राण व निरुपयोगी होते. अशी कला आपले जन्मप्रयोजनच हरवून बसते.
मानवी जीवनातील सुख-दुःखाचे, हर्ष-खेदाचे, आक्रोश-आक्रंदनाचे, भाव-विचारांचे, करुण-गंभीरतेचे आणि स्वप्न-वास्तवाचे प्रकटीकरण करण्याकरिताच कला जन्मास आली. कलेने संगीत, नृत्य, गायन, चित्र, शिल्प, साहित्य इत्यादी नानाविध रूपे धारण केली. आजघडीला कलेची ही सर्वरूपे जीवनव्यापी, अतिशय समृद्ध व आशयसंपन्न असली तरी यातील साहित्यकला ही अधिक व्यापक, संवादी व प्रभावशाली आहे. साहित्यकला ही समाजजीवनातील भावविचारांची सूक्ष्मातिसूक्ष्म जीवन स्पंदने जिवंतपणे टिपणारी व शब्दांच्या माध्यमातून वाचकांशी थेट व सुस्पष्ट संवाद साधणारी अतिशय परिणामकारक, प्रभावी व प्रवाही कला आहे. समग्र जीवनाला सर्वांगाने व सर्वार्थाने मुखरित करण्याच्या गरजेतून साहित्य कला कविता, कथा, कादंबरी, नाटक, ललित निबंध, वैचारिक निबंध, आत्मचरित्र, चरित्र व स्वकथन इत्यादी वाङ्मयप्रकार अस्तित्वात आले. साहित्य कलेने खऱ्या अर्थाने मानवी समाज जीवनाची जडणघडण केली. त्याला स्पष्ट दिशा दाखविली. त्यामुळेच साहित्यकलेला मानवी जीवनात विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच साहित्यकलेची जबाबदारीही शतपटीने वाढलेली आहे....(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मूल्यजागर