कोरोना काळात अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी आली. अण्णाभाऊंचे सर्व साहित्य, विचार समाजापर्यन्त पोहोचविण्याची एक अधिकृत संधी म्हणून मी या काळाकडे पाहात होतो. डॉ. सोमनाथ कदम यांच्या मित्रपरिवारांनी ठरवून शंभर व्याख्याने` ऑनलाईन उपलब्ध करून दिली. नव्याने अभ्यासक अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेताहेत असे निदर्शनास आले तरी कुठूनही काही नवीन येत नाही असेच जाणवत राहिले आणि शेवटी या मतापर्यन्त मी आलो की अण्णाभाऊंच्या प्रेमापोटी, भावनेपोटी लेखन करणाऱ्या अभ्यासकांनी अण्णाभाऊंची प्रतिमाच अर्धवट, कृत्रिम, मलीन असत्य बनवून टाकली. तीन चार चरित्रांचा आधार घेत अनेक गोष्टींचा शोध मी घेत होतो पण कुठल्याही बाबीला पूर्णता नव्हती. मार्क्सवादी अण्णाभाऊंची प्रतिमा ठसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी अण्णाभाऊतील व्यापक मनाचा कलावंत मन मोकळ्या मनाचा माणूस अजिबात जाणीवपूर्वक दडवला कसा ? अण्णाभाऊंच्या कर्तृत्वाने भारावून गेलेल्या त्यांच्या जवळच्या माणसांनी अण्णाभाऊंच्या क्रांतिकारक शाहिरीचा फक्त फायदा करून घेतल्याचे आज जाणवत आहे. अण्णाभाऊंसारखा क्रांतिकारक विचारांचा कलावंत फक्त मार्क्सच्या विचारातून निर्माण होतो असं कुंपण त्यांनी अण्णाभाऊंना घालून त्यांचे व्यापकपण झाकले की काय असे वाटायला लागते. अण्णाभाऊ अनेक ठिकाणी अबोल आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रम पाहिले, सभांना हजेरी लावली. संप, मोर्चे, आंदोलने यशस्वी केली. जलसे, तमाशे पाहिले. पुस्तके, कथा-कादंबऱ्या लिहिल्या आणि शक्य होईल तिथे ते बोललेही. पण या बोलण्याची वाच्च्यता ज्या पक्ष, संघटना, कला समूहांनी करायला हवी होती ती केली नाही. अण्णाभाऊंचं बोलणं एकांगी राहिले. त्यांच्या कथेतून, कादंबरीतून ते बोलले ते अभ्यासक, चरित्रकार यांनी ठळकपणे मांडले असते तर अण्णाभाऊंचे बोलणे त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या जीवनाचा एक भाग झाला असता मात्र ते घडू शकले नाही. अण्णाभाऊ प्र के. अत्रेंना भेटले, एस्. एम्. जोशींना भेटले, कॉ. श्री. अ. डांगे यांना भेटून बोलले पण त्यांची एकदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी भेट कशी झाली नाही? हा प्रश्न अत्यंत गंभीर असून उत्तरादाखल सारे संदर्भ सारे जीवनतळ खोलात जाऊन शोधण्याची आवश्यकता आहे. जिथे जिथे अण्णाभाऊ साठे बोलले नाहीत असे वाटते तो तो परिसर त्यांच्या बोलीने निश्चितच जीवंत झाला असेल. ही निशब्दता प्रकट बोलीत उमटली तर त्यातून अण्णाभाऊंच्या मनातले अनेक विचार, अनेक धागेदोरे, अनेक अनुकूल प्रतिकूल नाद निदादतील यात मला शंका वाटत नाही. अण्णाभाऊंच्या जीवनातील जागा शब्दरूप झाल्या तर एक नवेकोरे अण्णाभाऊ संपूर्ण समाजासमोर उभे राहू शकतात.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अण्णा भाऊ साठे समजून घेताना