यशोधरा हे जीवसृष्टीला कोवळ्या पहाटे पडलेलं मानवी मनाच्या अंतरंगाचं चिमटीत न मावणारं स्वप्न ! गोपा हे यशोधराचं अल्लड रुप पण ते तेवढंच समंजस, अंतर्मुखतेची परिपूर्णता. आपला सहचर मानवी आक्रंदनाच्या शोधात व्याकूळ ही भावना यशोधराचं रोमनरोम कुरतडत राहते आणि त्यातून जीवसृष्टीच्या अमीट सत्याच्या वाटांचा शोध सुरु होतो. या शोधाचा स्त्रोतच यशोधरापासून सुरु होतो. असीम आणि अपार समंजसपणा-आकलनशक्ती, गुंत्याची उकल करण्याचं शब्दातीत सामर्थ्य, सिद्धार्थाच्या मनातील रौद्र आणि वादळी लाटांचा किनारा म्हणजे यशोधरा! त्याग समर्पण यशोधराच्या पायथ्याशी येऊन थांबतात. विशालताही लीन व्हावी अशी यशोधराची मनोभूमी. ही नाट्यसंहिता केवळ तथागत बुद्धाचा प्रवास सांगत नाही तर बुद्धासह यशोधरेच्या प्रवाही आणि निरीच्छ वाहत्यापणाची साक्ष देते.
नारायण जाधव येळगावकर हे मूलत: कवी असल्यामुळे अनेक घटनांच्या संवादात लक्षणीय संवदेनशील विधानं आपल्याला जाणवतील. पण ती अनाठायी नाहीत, आपसूक आलेली आहेत. काळ हा महापुरुषांच्या आयुष्याबरोबर दंतकथांचंही ओझं घेऊन वाहत असतो. म्हणूनच, महापुरुषांचं आयुष्य किंवा त्यांचा विचार चित्रीत करताना कमालीची जोखीम पत्करावी लागते. इतिहासातलं सत्य निसटू नये तरीही कल्पकसृष्टी सत्यतेला जाऊन भिडावी हे नारायणरावांच्या लेखनीचे सामर्थ्य मानावे आणि यशसुध्दा! नारायणराव जाधवांच्या शब्दकळेचा अन्य एक विशेष नोंदवायला हवा. त्यांच्या भाषेला वक्तृत्वाचा सोस असल्यामुळे ती थेट वाचकाच्या ताबा घेते. त्यामुळे अनेक विधानं वाचकाच्या मनात रुंजी घालतात. काही विधानांना तर सुभाषितांचे रुप प्राप्त झाल्याचं वाचक अनुभवतील.
भारतीय असो वा पाश्चात्य भाषा असो यशोधरा तशी दुर्लक्षित. नारायणराव जाधव येळगांवकर यांच अभिनंदन यासाठी की, यशोधरा चित्रित करताना त्यांनी यशोधराची मानसिक, भावनिक, बौद्धिक क्षमतांची आरास तर मांडलीच पण त्याबरोबर यशोधराची जीवनदृष्टी लख्खपणे आपल्यासमोर ठेवली. हे नाटक भारतीय भाषांसह अन्य भाषांमध्ये भाषांतरीत व्हावे, इतके सामर्थ्य ह्या नाटकात आहे. नारायणरावांच्या पुढील प्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा...!
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : यशोधरा