वाचक व रसिक बंधू-भगिनींनो नमस्कार.
बिऱ्हाड (कोरोना काळातील आदिवासींनी भोगलेल्या हाल-अपेष्टांवर आधारित हायकू संग्रह) हा माझा दुसरा हायकू संग्रह आपल्या सर्वांच्या हाती देतांना मला आनंद होत आहे. कोविड - १९ चा काळ साऱ्यांना बऱ्याच गोष्टी शिकवून गेला तसेच अनेक गोष्टींची जाणीव करून गेला. या काळात अनेकांच्या कुटुंबांची वाताहत झाली. अनेक लोक बेरोजगार झाली. अनेकांनी कोरोनाच्या भीतीपोटी आपला जीव गमविला. आपले गाव, कुटुंब सोडून हजारो मैल दूर शहरात कामानिमित्त गेलेल्या अनेक आदिवासी माणसांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. महिनोमहिने शहरातून पायी प्रवास करून आपले घर गाठावे लागले. तिकडून आल्यानंतर कॉरंटाइन राहावे लागले. अनेक कुटुंब उपाशी मरू लागली. कामधंदे बंद झाले. अशा कठीण काळात संकटावर मात करून सर्व जग श्वास रोखून एक एक दिवस जीवन जगू लागला. कोरोना आल्यानंतर आदिवासी माणसासमोर स्वच्छतेचा प्रश्न उभा राहिला. आदिवासी भागात तुटपुंज्या सोईसुविधांच्या माध्यमातून कोरोना सारख्या आजारावर मात करणे दिवसेंदिवस कठीण जाऊ लागले. कामधंदे बंद पडल्याने आदिवासी माणसे उपाशी मरू लागली यामुळे अनेक दिवस अर्धपोटी उपाशी राहू दिवस कंठावे लागले. गाव व तालुक्याच्या गावी असलेल्या अपुऱ्या सुविधांमुळे आपल्या डोळयासमोर स्वतःच्या नात्यागोत्यातील रक्ताची माणसे मरतांना पहावे लागले परंतु शेवटच्या क्षणी त्यांच्या अंत्यसंस्काराच्या समयी जवळ जाऊन शेवटचे दर्शन सुद्धा न घेता यावे इतके दुर्दैव माणसांना अनुभवावे लागले. उपासमार, भूकबळी व बेकारीने कळस गाठला. अनामिक भिती माणसांना आतल्या आत खाऊ लागली. एकटेपणा, सुसंवादाचा अभाव यामुळे काहीजण मानसिक आजारांनी ग्रासले गेले. यात काहींनी आत्महत्या केल्या. जीवन जगणे कठीण झाले. डॉक्टर्स व पोलीस बंधू-भगिनी आपले कुटुंब सोडून व जीव धोक्यात घालून रात्रंदिवस समाजसेवेत गढून गेले. एक कोरोना सारखी महामारी जगाला अनेक गोष्टी शिकवून गेली. या कोरोनाच्या महामारीत मात्र आदिवासी माणूस बेकारी बेरोजगारी, भूकबळी, उपासमार याने प्रचंड हादरून गेला. त्याला यावेळी प्रचंड मानसिक, शारीरिक पातळीवर संघर्ष करीत जीवन जगावे लागले. कोरोना आदिवासी माणसाने भोगलेल्या हाल-अपेष्टा व जगण्यासाठी केलेला संघर्ष यांचा मागोवा या हायकू संग्रहात घेतला आहे. वाचक वर्गाच्या पसंतीस निश्चितच हा हायकू संग्रह उतरेल यात शंका नाही. धन्यवाद !!!
- डॉ. मधुचंद्र लक्ष्मण भुसारे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : बिऱ्हाड