गेली ३०-३५ वर्षे मी सातत्याने समाजप्रबोधनाच्या कार्यात रस घेत आलोय. वाणी आणि लेखणी यथाशक्ती वापरीत आलो आहे. तसा मी शिक्षणानं संगणक, [Computer Engineer] क्षेत्रातला पण साहित्याची आवड तरुणपणातच लागली. त्या काळी आचार्य अत्रे नावाचा एक चमत्कार आम्ही पाहिला. तहानभूक विसरून त्यांची अफाट भाषणे ऐकली. साहित्याची आवड त्यातूनच निर्माण झाली असावी, असे वाटते. आयुष्याची पंचाहत्तरी उलटून केव्हाच गेली आहे. तरीही जिथे जिथे म्हणून समाजपरिवर्तनाचा घाट घातला जातो... तिथे तिथे मी सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. माझ्या २० पुस्तकांपैकी निम्मी पुस्तके याच विषयांशी संबंधित आहेत. `अंधश्रद्धेची वावटळ` हे पुस्तकही याच विचारांची बांधिलकी सांगणारे आहे. आमच्या ग्रामीण भागातील बहुजन समाज हा अजूनही अंधश्रद्धेच्या चिखलात रुतलेला आहे. त्यांना समोर ठेवूनच हे पुस्तक लिहायचे ठरविल्याने प्रत्येक अंधश्रद्धा फक्त एकाच पानावर म्हणजे २५०-३०० शब्दांतच मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, अंधश्रद्धेच्या बाबतीत बोलायचं तर ग्रामीण भाग आणि शहरी विभाग यामध्ये उडिदामाजी काळे-गोरे काय निवडावे असा प्रकार आहे. खेड्यातील अंधश्रद्धा खेडवळ तर शहरातील थोड्या Sophisticated एवढाच काय तो फरक ! पु. ल. शहरी मंडळींच्या अंधश्रद्धांना Air Condition अंधश्रद्धा म्हणतात. उदाहरणच द्यायचे झाले तर ग्रामीण भागातील ठळक अंधश्रद्धा म्हणजे नवस बोलणे, तो फेडण्यासाठी पशुबळी देणे, भूता-खेतांवर, करणीवर विश्वास ठेवणे तर शहरी लोकांच्या आवडत्या अंधश्रद्धा म्हणजे ज्योतिष, वास्तुशास्त्र, रेकी, गर्भसंस्कार इत्यादी.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अंधश्रद्धेची वावटळ