प्रज्ञा दया पवार यांच्या आरपार लयीत प्राणांतिक या दीर्घ कवितेच्या निमित्ताने जाणवणाऱ्या काही नव्या सांस्कृतिक अविष्कारांचे म्हणून स्वागत करायला हवे. असे कोणते परिवर्तन आणि पर्याय कविता बरोबर घेऊन येते? वर्ग, जात आणि पितृसत्ताकता ही समाजातल्या सत्ताकारणातील काही प्रभावक्षेत्रे आहेत. (अर्थात माणसांना असमान उतरंडीत बांधणारी याव्यतिरिक्तही इतर अनेक क्षेत्रे आहेत: जसे, हिंदू आणि मुसलमान, नागर आणि अ-नागर, आदिवासी आणि स्वत:ला पुढारलेले समजणारे समूह, इत्यादी.) जातीजातीमध्ये विभागलेले कष्टकरी, दलित आणि स्त्रिया उच्चनीचतेच्या उतरंडीमध्ये रचल्या गेलेल्या आहेत. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे रचलेली व्यवस्था म्हणजे श्रेणीबद्ध असमानतेची उतरंड आहे, कष्टकऱ्यांमध्ये विभाजनाच्या भिंती उभी करणारी. म्हणून सर्व पुरुष आणि सर्व स्त्रिया समान असू शकत नाहीत. एक दलित स्त्री म्हणून या श्रेणीबद्ध समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीचे जगणे हे त्या उतरंडीच्या सर्वात वरच्या पायरीवर, (मग ती उच्च जातीची असो वा वर्गाची) स्त्री म्हणून उभ्या असलेल्या व्यक्तीसारखे कसे होईल? अथवा तिच्याच जातीच्या पायरीवर उभ्या असलेल्या, पण तरीही पारंपरिक पितृसत्ताक विचारा/ व्यवहारांनी तिच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या पुरुषासारखे तरी कसे असेल? ही स्त्री समाजजीवनाच्या सर्व पातळ्यांवर, आणि कलाव्यवहारात कायमच दुर्लक्षित राहिली आहे. तिच्या गावकुसाबाहेरच्या जगण्याचा मूल्यात्मक वेध घेणारे, तिच्या अनुभवांना मध्यवर्ती ठेवून सभोवतालच्या वास्तवाची कठोर समीक्षा करणारे तिचे साहित्य मात्र मराठी सांस्कृतिक विश्वात अभावानेच आढळते. प्रस्थापित मराठी साहित्याने/संस्कृतीने आणि विशेषत: कवितेने गोडवे गाऱ्हाणी गायली आहेत ती जातीवर्गाच्या वरच्या पायरीवरच्या स्त्रीची. ह्या कवितेने तिच्या मायेचा, प्रेमाचा, सुखदुःखांचा, प्रतिमांचा, जगण्याचा अविष्कार केला आहे. तो कधी सच्चा आहे तर कधी मतलबी! पण दलित कवितेनेही (उदाहरणार्थ, नामदेव ढसाळ) दलित स्त्रीच्या जगण्याचा हिशोब मांडला खरा परंतु त्यात पुरुषप्रधान नजरेतून मांडलेले दलित स्त्रीच्या मादी म्हणून जगण्याचे पुरुषकेंद्री आलेखन महत्त्वाचे ठरत होते.
- माया पंडित
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आरपार लयीत प्राणांतिक