डॉ. सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याच्या स्मृती जतन करणारा ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ संपादित `सूर्यप्रभा` हा ग्रंथ आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचा दस्तावेज ठरावा. त्याची कारणे अनेक आहेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे गेल्या तीन दशकांपासून मराठी पत्रकारितेत `कलमबाजी`चा ठसा उमटवणारे दिवाकर शेजवळ हे या ग्रंथाचे संपादक आहेत. केवळ पत्रकारच नव्हे, तर राजकीय विश्लेषक, सामाजिक प्रश्नांचे आणि लढ्यांचे अभ्यासक ही त्यांची ओळख आणि त्यांनी चळवळीत गेली चार दशके दिलेला सहभाग सर्वश्रुत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, माईसाहेबांना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर संशयातून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून अपमानित, एकाकी जीवन जगण्यास भाग पाडणाऱ्या एका राजकीय षड्यंत्राचे विच्छेदन करणारा हा स्मृतिग्रंथ आहे. आंबेडकरी चळवळीत चैतन्य, ऊर्जा आणि लढाऊ बाणा जागवणाऱ्या `दलित पँथर` स्थापनेचा सुवर्ण महोत्सव आणि माता रमाईंचा शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव साजरा होत असताना माईवरील हा ग्रंथ वाचकांच्या हाती पडत आहे. माई आणि पँथर्स यांच्यातील नाते जगजाहीर आहे. हा ग्रंथ प्रकाशित करण्याचा दिवाकर शेजवळ यांचा संकल्प हा त्यांची चळवळीबद्दलची आस्था, अभ्यासू वृत्ती आणि साक्षेपीपणाची प्रचिती देणारा आहे. डॉ. सविता तथा माईसाहेब यांनी आपल्याला किती जपले, याची असलेली जाणीव बाबासाहेबांनी वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. माईंनी केलेला त्याग, त्यांची सेवावृत्ती ही बाबासाहेबांना अनेक पातळीवर बळ देणारी ठरली. शेवटी एकच म्हणावेसे वाटते की, रमाई आणि माईसाहेब या दोघीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या विशाल आभाळाला पेलणाऱ्या निश्चल खांब होत्या! या स्मृती ग्रंथात नामवंत लेखक, विचारवंतांपासून माईंचा सहवास लाभलेल्या अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दिवाकर शेजवळ यांच्यातील साक्षेपी संपादकाने माईसाहेबांचे १५ मार्च १९८० रोजीचे भारतीय दलित पँथरच्या दिल्लीच्या अधिवेशनातील इंग्रजी भाषण, शांतिस्वरूप बौद्ध यांचा मौलिक हिंदी लेख आणि महापरिनिर्वाणाच्या अगोदरचे तीन महिने बाबासाहेबांवर यशस्वी उपचार करणारे औरंगाबादचे फिजिओथेरपिस्ट अहमद हुसेन मशहादी यांचा इंग्रजी लेख या ग्रंथात अनुवादित करून समाविष्ट केला आहे. त्यातून माईसाहेबांचे विविध पैलू तर समोर येतातच. पण त्याने या ग्रंथाचे संदर्भमूल्यही वाढले आहे.
■ अर्जुन डांगळे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : सूर्यप्रभा : डॉ. माईसाहेब आंबेडकर