माणसाचे मन हे विहिरीसारखं असतं. कितीही पाणी उपसलं तरी ते झिरपतंच राहतं. रोजच्या जगण्यातल्या बऱ्यावाईट घटना आणि अनुभवानी त्याचे जीवन समृध्द होत असतं आणि म्हणून माणसाच वय वर्षानी मोजण्यापेक्षा अनुभवांनी मोजावं, अशी माझी धारणा आहे. या अनुभवात सुध्दा ज्याच्या अनुभवाची वेदना मोठी त्याचे आयुष्य मोठ, असं मला वाटतं. प्रत्येकाच्या वाट्याला येणारे अनुभव है वेगवेगळे असले तरी त्यातूनच माणूस घडत असतो.
माझ्याही जीवन प्रवासात असे आलेले बरे वाईट अनुभव, भेटलेली नाना प्रकारची माणसे, त्याच्या विविध स्वभावांचे नमुनेदार कंगोरे यांची वास्तव व्यक्तीरेखा रेखाटणे हा माझा लिहिण्यामागचा खरा हेतू आहे. कुणाचीही बदनामी करण्याचा नाही किंवा सनसनाटी म्हणून आणि लोकप्रियता मिळविण्यासाठी तर मुळीच नाही. काल्पनिक किंवा कपोलकल्पीत आणि अतिरंजीत प्रसंग तुम्हाला माझ्या लेखनात चुकूनही आढळणार नाहीत.
मानवी मनाचे कोड उलगडत असताना वयाची पंचावन्न वर्षे कधी हातावर तूरी देऊन गेली ते कळलंही नाही. मानवाच्या निर्मितीचं नातं जमिनीशी असलं तरी जन्माला आलेला प्रत्येक जीव आपल्या मनानं आकाशाला गवसनी घालण्याचा प्रयत्न करीतच असतो. बहिणाबाई चौधरींनी या मनाचे अतिशय समर्पक वर्णन केलयं.
- विठ्ठल आर. औटी
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : भावस्मृतींच्या झरोक्यातून