इ. स. १८५४ ते १९२० ह्या आधुनिक-अर्वाचीन मराठी कवितेच्या क्रांतिकाळात सावित्रीबाई फुले, म. फुले, केशवसुत ह्यांच्याबरोबरच रे. ना. वा. टिळक, माधवानुज, गोविंदाग्रज, रेंदाळकर, बी, बालकवी ह्या कवींनीही आपापल्या परीने सामाजिक कविता लिहिल्या आहेत. फुले दांपत्याचा अपवाद वगळता अन्य सर्व कवींवर आणि त्यांच्या सामाजिक कवितांवर केशवसुतांचा आणि केशवसुतांच्या तुतारीव गोफण ह्यांसारख्या अनेक सामाजिक कवितांचा प्रभाव दिसून येतो. शिवाय ह्या काळातील बहुतांश सामाजिक कविता ह्या आगरकरी विचारसरणी व्यक्त करणाऱ्या आढळतात. त्या क्वचित मजूर, अस्पृश्य, दुष्काळग्रस्त लोक ह्यांच्यासारख्यांचे दुःख चित्रित करतात. परंतु त्यांचा मुख्य भर स्त्रीजीवनाशी संबंधित समस्या चित्रित करण्यावर दिसून येतो. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी लिहिली गेलेली इंग्रजी सौंदर्यवादी (रोमँटिक) कविता आणि समीक्षा हा केशवसुतांचा आणि त्यांच्या पिढीतील कवींचा आदर्श होता. वर्डस्वर्थ, कोलरिज, शेली, बायरन हे प्रारंभीचे कवी टेनिसन, ब्राऊनिंग हे नंतरचे कवी ह्यासंदर्भात महत्त्वाचे होत. कांट, हेगेल, श्लेगेल ह्यांचे जर्मन तत्त्वज्ञान आणि समीक्षा हा इंग्रजीच नव्हे, तर संपूर्ण युरोपीय सौंदर्यवादाचा आधार होता. हा सौंदर्यवाद इंग्लंड-अमेरिकेत स्थिरावला. नंतर तो इंग्लंडमधून भारतात आणि महाराष्ट्रात आला. तो एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठीसह बऱ्याच भारतीय भाषांमध्ये प्रभावी होता. फुले दांपत्याची कविता मात्र ह्याला एकमेव अपवाद आहे.....(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मराठी सामाजिक कविता : शोध आणि बोध