अहमदनगर जिल्हा विविधतेने किती समृद्ध आहे याची जाणीव आपल्याला हे पुस्तक वाचून होते. यातील गावे आधुनिकता आणि पारंपरिकता दोन्ही जपणारी आहेत. कोणते गाव कशासाठी प्रसिद्ध आहे. तेथे नेमके काय पाहण्यासारखे आहे, त्या गावाची भौगोलिक, तसेच तेथे होऊन गेलेल्या थोर व्यक्ती यांचीही माहिती या पुस्तकात एकत्रित दिली आहे. प्रत्येक गावाच्या नावाची व्युत्पत्ती हे एक या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. उदा. `दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांनी आपल्या सामर्थ्याने कोपराने गोदावरी नदीचा प्रवाह बाजूला लोटल्याने तो बाजूने वाहू लागला. त्यामुळे या गावाला ‘कोपरगाव` हे नाव पडले. त्या त्या गावाशी निगडीत कथाही दिल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे. उदा. कळसुबाईच्या शिखराविषयीचीकथा. एखादे स्थळ नुसते पहाणे व त्यामागचे ऐतिहासिक, सामाजिक असे विविध संदर्भ माहीत करून घेऊन पहाणे यात खूप फरक आहे. उदा. श्रीक्षेत्र देवगडला जाऊन नुसते दर्शन घेणे व त्यामागील कथांचे संदर्भ माहीत असताना पहाणे यात निश्चित फरक आहे. प्रत्येक गावामागील विविध संदर्भ परंपरा कळल्यामुळे ते ते गाव आपल्यासमोर जिवंत साकार होते. ते गाव तेथील प्रेक्षणीय ठिकाणे अगोदरच माहिती मिळाल्याने आपण अधिक जाणीवपूर्वक पाहून अधिक आनंद मिळवू शकतो. शिवाय अगोदर माहिती मिळाल्यामुळे एखादे गाव पाहून आल्यावर तेथील एखादे प्रेक्षणीय स्थळ आपण पाहिले नाही तर जी चुटपूट लागते ती लागणार नाही.पर्यटकांना प्रत्यक्ष प्रवासात उपयुक्त ठरणारे ज्यांनी प्रवास केला त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद देणारे आणि जे प्रवास करू शकत नाहीत त्यांना घरबसल्या प्रवास घडवून ते ते स्थान प्रत्यक्ष पाहिल्यासारखा आनंद देणारे असे हे पुस्तक आहे. पर्यटकांना मार्गदर्शक म्हणून जसे हे पुस्तक महत्वाचे आहे तसाच एक संदर्भग्रंथ म्हणूनही त्याचे मूल्य अधिक आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अंतरंग अहमदनगर जिल्हा