देशभक्त शेषराव दौलतराव घाटगे (१९११-१९४५) यांना अवघे ३४ वर्षांचे आयुष्य लाभले. वैद्यकीय शिक्षणासाठी त्या काळात ते नेरपिंगळाई (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथून कलकत्ता (कोलकाता) येथे गेले. तेथील स्वातंत्र्य चळवळीच्या जबरदस्त प्रभावात देशभक्तीने भारले गेले. शिक्षणाला रामराम ठोकून गावी नेरपिंगळाईस परतले. स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिले. काँग्रेसप्रणीत स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होऊन अखेरपर्यंत अग्रेसर राहिले. स्वातंत्र्याची पहाट पाहणे मात्र त्यांच्या नशिबी नव्हते. स्वातंत्र्य समरात सक्रीय असतानाच शेषरावांना हौतात्म्य लाभले. बहुजन समाजातील अनेक स्वातंत्र्य सैनिक आ क्रांतिकारकांच्या चरित्र साधनांचे जतन व संशोधन न झाल्याने शेषरावांचेही चरित्र व कर्तृत्त्व समाजाला आजपावेतो अज्ञातच होते. या ग्रंथाच्या माध्यमातून ते प्रथमच ते समोर आले आहे. कलकत्यास गेलेले असताना शेषराव घाटगे यांचा विवाह झालेला होता. तेथून त्यांनी पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांना पत्रे लिहिली आहेत. त्यातील काही पत्रे त्यांचे नातू डॉ. विजय घाटगे यांच्या हाती लागली. त्यांनी जतन करून ठेवलेली ही पत्रे मराठी पत्र वाङ्मयातही लक्षणीय ठरावीत, अशी आहेत. त्या पत्रातून शेषरावांचे व्यक्तित्व तर व्यक्त होतेच पण त्यांची पुरोगामी, सामाजिक, राजकीय दृष्टी आणि स्वातंत्र्याची आसही प्रतित होते.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : देशभक्त शेषराव घाटगे