म्हटलं तर कमलताई कदमांचे हे आत्मचरित्र आहे आणि म्हटलं तर एक सुंदर कादंबरी देखील आहे. हे आत्मचरित्र म्हणजे अस्पृश्य जातीत जन्मलेल्या ध्येयवेड्या, ध्येयवादी, झुंजार विरश्रीचे जीवनयुध्द आहे. प्रत्येकांनी वाचावं, अनुभवावं असं हे प्रेरणादायी चरित्र आहे.
आरपार वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती. या आत्मचरित्रावर मुलींच्या शिक्षणाच्या प्रेरणेची गाथा म्हणून एक चित्रपट निर्माण करता आल्यास राज्यातील सर्व महिला, आया आणि मुलींना प्रेरक ठरणार आहे. श्रीमती कमल कदम धैर्याने, चिवट जिद्दीने विषारी विचारांशी झुंज देत रक्ताळलेल्या शरीर आणि मनाने काट्यावरुन चालत राहिल्या. या आत्मचरित्राने दलित आणि ललित साहित्यात मोलाची भर घातली आहे. राज्यशासनाने या पुस्तकाच्या लाखभर प्रति छापून किंवा विकत घेवून महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतील मुलींना आणि शिक्षकांना वाचायला द्यायला हव्यात, म्हणजे प्रेरणेचा प्रबोधन प्रकाश छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात प्रकाशमान होईल आणि एकही मुलगी शाळाबाह्य राहणार नाही.
आरपार या आत्मचरित्राने अपमान, अवहेलना, आगतिकता दुःखाच्या वेदनादायी अनुभवांना आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाच्या आत्मभानाने प्रकाशमान केले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या समतेच्या ऐतिहासिक लढ्यातील यशाचा एक दीपस्तंभ म्हणून या चरित्रग्रंथास सन्मानीत करायला हवे. हीच शुभकामना.......
डॉ. गोविंद नांदेडे
पूर्व शिक्षण संचालक, म.रा.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आरपार