तमाशा कलेवर आजवर बरीच पुस्तके लिहिली गेली आहेत. काही कलाकारांची चरित्रेही प्रसिद्ध झाली आहेत. त्यात आता प्रा. मिलिंद कसबेंच्या पुस्तकाची भर पडली आहे. मिलिंद कसबेंचे पुस्तक ʽतमाशा : कला आणि कलावंत’ सर्वार्थाने वेगळे आहे. प्रा. कसबेंनी हे पुस्तक सामाजिक प्रश्नांच्या अंगाने लिहिले आहे.मागास, अस्पृश्य समजल्या जाणा-या महार, मांग, कोल्हाटी, गोपाळ आदी जातींचे कलाकार तमाशात जास्त आहेत. त्यांनीच ही कला टिकविली आहे. पण सुशिक्षित मध्यम-वर्गीयांमध्ये ही कला या जातींच्याप्रमाणे उपेक्षित राहिली. सर्वसामान्य लोकांचे रंजन करणारी ही कला शहरी भागात मानाचे स्थान मिळवू शकली नाही याचे वाईट वाटते.विठाबाईंची सविस्तर माहिती या पुस्तकात आली आहे. विठावाईंचे वडील भाऊ आणि स्वत: विठाबाई या दोघांनाही राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला. आजतागायत हे संपूर्ण कुटुंब अजूनही तमाशातच कार्यरत आहे. दोन राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या विठाबाईंच्या कुटुंबाने मनापासून तमाशा कलेची जोपासना केली आहे. परंतु विठाबाईंचे शेवटचे दिवस फार हलाखीत गेले याचे सविस्तर वर्णन प्रा. कसबेंनी केले आहे, वैभवाच्या शिखरावर पोचलेली विठाबाई आयुष्याच्या शेवटी फार दारिद्र्याचे जीवन जगली. तमाशातील श्रेष्ठ कलाकारांच्या वाट्याला असे दिवस आले आहेत. पठ्ठेबापूराव, पवळा इत्यादी कलाकारांना आयुष्याच्या शेवटी दुस-यांच्या दयेवर जगावे लागले ही बाब अस्वस्थ करणारी आहे. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे.
तमाशा कलेत आयुष्य घालविलेल्या चंद्रकांत फुलवडे यांची मुलाखत डोळ्यात अंजन घालणारी आहे. स्वतःची मुले देखील ओळख देत नाहीत अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली आहे.महाराष्ट्र शासन वृद्धाश्रमाची योजना राबविते. वृद्धाश्रमांना शासन अनुदान देते. तमाशा क्षेत्रातील वृद्धांसाठी शासनाने वृद्धाश्रम सुरू करावा. त्यांच्या जेवणाची, राहण्याची, औषधाची सोय करावी अशी सूचना मला करावीशी वाटते.तमाशा क्षेत्रात कर्ज हा एक मोठा प्रश्न आहे. फडमालक सावकाराकडून कर्ज घेतात. तमाशातील कलाकार फडमालकाकडून कर्ज घेतात.
अशाप्रकारे फडमालक कर्जबाजारी, कलाकार-कामगार कर्जबाजारी. कर्जावर चालणारा हा व्यवसाय आहे. कर्जामुळे कोणीही सुखी नाही. तमाशातील रात्रीचा राजा दिवसा कंगाल असतो. तमाशाला पैसा पुरविणारे बहुतेक सवर्ण असतात तमाशात काम करणारे मागासवर्गीय असतात. तमाशातील स्त्री कलाकार कर्जबाजारी असेल आणि कर्ज फिटले नाही तर तिला भांडवलदाराच्या स्वाधीन व्हावे लागते.तमाशा क्षेत्रातील कर्जबाजारीपणावर उपाययोजना झाली पाहिजे.
निळू फुले
2 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : तमाशा : कला आणि कलावंत
खूपच छान आणि माहितीपूर्ण मांडणी झालेली आहे