वसुंधरेवरील मानवजात वंश, राष्ट्र धर्म आणि संस्कृती यात विभागली गेल्यामुळे तिच्यावर स्पर्धा, हिंसा, द्वेष आणि दहशतवाद यांचे साम्राज्य पसरलेले दिसते. त्यातून वाढत चाललेली कमालीची भयग्रस्ततेची आणि असुरक्षिततेची भावना आज एका युगांताची चाहूल वाटावी इतकी प्रखर बनलेली आहे. अशी ही आजची असहाय आणि एकाकी बनलेली मानवजात या येणाऱ्या युगांताला सामोरे जाण्याचे बळ कसे अर्जित करू शकेल ?
त्यासाठी तिला तिच्या जन्मकाळच्या एकात्म मुळांचा आणि विकासक्रमातील प्रत्येक टप्प्यात घडून गेलेल्या युगांताचा शोध घ्यावा लागेल. मानव आणि धर्मचिंतन हा ग्रंथ याच शोधाचा एक प्रयत्न आहे.
हा ग्रंथ माणूस प्राणीसृष्टीतून मानवी सृष्टीत का आणि कसा आला असा प्रश्न उपस्थित करून सुरू होतो आणि मानवी विकासक्रमातील कलयुगाच्या अंताच्या तपशिलाने तो संपतो. प्राणी हा माणूस झाल्यापासून ते मध्ययुगाच्या प्रारंभापर्यंतच्या काळात त्याने त्याच्या जीवन अस्तित्वाच्या सुरक्षिततेसाठी आणि अर्थपूर्णतेसाठी कोणकोणत्या संस्था स्थापिल्या, त्यापैकी कोणत्या स्वत:च मोडल्या आणि कोणत्या विकसित करून निसर्ग व माणसामाणसातील नाती विकसित केली, त्याचा सामान्य वाचकालाही समजेल असा तपशील हा ग्रंथ देतो.
माणसाच्या मुळाचा आणि त्याच्या विकासाचा शोध घेण्यासाठी जगातील प्रमुख धर्माच्या प्राचीन वाङ्मयाचा आणि आधुनिक ज्ञान-विज्ञानातील विविध ज्ञानशाखांचा व्यासंगपूर्ण केलेला उपयोग हा मराठी भाषेतील अभूतपूर्व असाच प्रयत्न आहे.
डॉ. रावसाहेब कसबे यांनी अनेक वर्षांच्या परिश्रमातून माणसासंबंधीचे केलेले हे चिंतन जितके व्यापक, तितकेच सखोल आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मानव आणि धर्मचिंतन