नव्वोदोत्तर दलित पिढीने खाउजा धोरणातले डावपेच आपल्या जुन्या संघर्षाशी व नव्या अस्पृश्यतेशी ताडून बघितले. ग्लोबल गावकुसाची वेस मोठी झाली होती, वेगवेगळे ब्रँड व त्यासोबत भव्यदिव्य अर्थकारण आत येण्यासाठी! या सळसळत्या बदलांना अनुभवताना बाजाराच्या उत्पादनाची साधनेही बदलू लागली व उपभोगकर्त्याची जीवनशैली पालटली. हे बदल केवळ भौतिक नव्हतेच तर मूल्यबदलाचीही ती संक्रमणावस्था होती. हे सारे अंतर्गत संभ्रम आणि ढासळणारी स्थिरता यामागे जागतिक अर्थकारणाचे वेगळेच षड्यंत्र रचले जात होते. जागतिकीकरणाची नेमकी मेख वेगवेगळ्या पद्धतींनी दलित कवी समजून घेऊ पाहात होता व आपल्या कवितेतून मांडत होता. गावगाड्यातल्या श्रमिकांचे व त्यांचे अर्थार्जन करणाऱ्या वेगवेगळ्या पारंपरिक कारागिरांचे जागतिकीकरणात काय स्थान असेल? या नव्या अर्थव्यवस्थेत एकूण दलित समूहाची काय स्थिती असणार आहे? जुनी वेस जाऊन नव्या ग्लोबल वेसेच्या बाहेरच पुन्हा आमचं स्थान असणार आहे का? यासारखे मूलभूत प्रश्न दलित कवितेतून उपस्थित केले जात होते.
शेषराव पिराजी धांडेंच्या कवितेचा पाया हा चिंतनाचा आहे पण त्यांच्या भाषेत जडत्व नाही. तीव्र विद्रोही सूर आवळत नाही. एका संथ लयीत व्यवस्थेची छाननी करण्याची पद्धत व सहज, सोप्या शब्दांत मनातलं सांगण्याची एक तरल प्रकृती त्यांच्या कवितेचा स्थायीभाव आहे. पुष्कळदा त्यातली सरलता इतकी प्रामाणिक व्यवहाराची भाषा बोलून जाते की, एखाद्या अत्यंत साध्या-भोळ्या घरगुती गृहिणीने पाहुण्यांच्या ताटात वाढलेल्या भाजीच्या वाढत्या किंमतीवर सहज चिंता व्यक्त करावी, अगदी त्याच आविर्भावात शेषराव प्रेयसीच्या मोबाईलच्या टॉकटाईम विषयी बोलून जातात.....(प्रस्तावनेतून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आमचा आलेख कोराच (कवितासंग्रह)