एस. एस. सी. नंतर जीवन संपल्यासारखे वाटत होते. दहा वर्षे रापीच्या संगतीला लेखणी मेल्यासारखी हातात होती. हातातून गळू पाहणाऱ्या लेखणीला सावरणान्यासाठी एक मित्र पुढे आला. त्याच्यामुळे मी मिलिंद कला महाविद्यालयात दाखल झालो. मिलिंद परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे जीवनाची नव-नवीन क्षितिजे पहाण्याला चालना मिळाली. माझे अस्तित्व, अस्मिता येथे जागी झाली. येथे चाललेल्या साहित्य साधनेच्या वातावरणामुळे माझ्या अनुभवविश्वाला शब्द फुटले. गुरुवर्य प्रा. ल. बा. रायमाने, प्रा. मनोहर जिलठे आणि प्रा. अविनाश डोळस यांच्यामुळे माझ्या शब्दात आत्मविश्वास आला. मिलिंद कला महाविद्यालय वार्षिकांक, ‘अस्तित्व’, ‘पुरोगामी सत्यशोधक आणि ध्येय धुंद या अंकांमध्ये माझ्या शब्दांना प्रकाश लाभला.माझ्या मिलिंदच्या महेन्द्र ढोले, प्रशांत सोनुने, राम शेगांवकर, सुभाष सूर्यवंशी, वसंत घबसे, सुधाकर पखाले इ. बंधुंचे प्रेम आणि अस्तित्व द्वैमासिकाचे संपादकद्वय प्रा. अविनाश डोळस, प्रा. मनोहर जिलठे यांचा आपलेपणा यामुळे माझे हे शब्दशिल्प प्रकाशित होत आहे.
- राम दोतोंडे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : रापी जेव्हा लेखणी बनते (कवितासंग्रह)