गौतम बुद्ध वेगवेगळ्या कारणांनी घराबाहेर पडला. पण या सर्व कारणांमध्ये अधोरेखित करावे असे एक ठळक कारण होते ते म्हणजे पाणी! रोहिणी नदीचे पाणी!! शाक्य आणि कोलिय यांच्यात दरवर्षी रोहिणी नदीचे पाणी कोणी किती घ्यावे यावर वाद निर्माण व्हायचा. तो चिघळायचा. रक्त सांडायचे आणि रोहिणीच्या पाण्याबरोबर वाहून जायचें. सिद्धार्थ गौतमाने शाक्य संघाची दीक्षा घेतल्यानंतर आठ वर्षांनी असाच पेचप्रसंग निर्माण झाला. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शाक्यांनी कोलियांवर हल्ला करावा, युद्ध करावे असा निर्णय शाक्य संघाने घेतला. संघाचा निर्णय एकदा का झाला की त्याला विरोध करण्याची तरतूद नव्हती. पण तरुण सिद्धार्थाने विरोध केला. तो म्हणाला, पाण्यासाठी युद्ध ही कल्पना काही बरोबर नाही. युद्धाने युद्ध वाढतच जाते. त्याऐवजी कलहाचे कारण शोधण्यासाठी आपल्याकडील दोन आणि कोलियांकडील दोन शहाणी माणसे एकत्रित करून लवाद नेमावा. शहाणपणाने विचार करून युद्धाऐवजी सोडवावा. खरे तर आजच्या भाषेत सांगायचे तर बुद्ध जल आयोगाची (Water • Commission) कल्पना मांडत होता. शाक्यांनी ते ऐकले नाही. य निर्णयाला विरोध केल्याबद्दल शिक्षा करण्याचे हत्यार त्यांनी उगारले. सैन्यात दाखल होऊन सिद्धार्थाने कोलियांविरुद्धच्या युद्धात भाग घ्यावा किंवा फाशी अथवा देशत्यागाची शिक्षा भोगावी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी सामाजिक बहिष्कार स्वीकारावा, त्यांच्या सर्व जमिनी, संपत्ती जप्त करण्यात यावी शिक्षेचे वेगवेगळे पर्याय पुढे येत होते. सिद्धार्थाने देशत्यागाचा पर्याय स्वीकारला. ‘माझ्या चुकीबद्दल कुटुंबियांना कशाला शिक्षा?’ असा प्रश्न उपस्थित करून त्याने स्वत:च संघाला सांगितले की फाशी अथवा देशत्याग यांपैकी काय ते तुम्हींच ठरवा. शेवटी सिद्धार्थ परिव्राजक होऊन देशाबाहेर पडला. पुढे काही दिवसांनी शाक्यांच्या राज्यातच युद्धाला विरोध झाला. शाक्य आणि कोलिय यांनी सामोपचाराने प्रश्न सोडवला. सिद्धार्थाने आता परत आपल्या राज्यात जावे असा सल्ला पुढे आला, पण त्याने तो मान्य केला नाही. कारण त्याला शोध घ्यायचा होता मानवी दुःखाच्या उगमस्थानाचा....!
पुस्तकातून...
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : महात्मा फुल्यांची जलनीती