विन्सेन्ट व्हॅन गॉग नावाच्या एका भयानक अस्वस्थ चित्रकाराने कॅनव्हासवर जे फटकारे ओढले, ते त्याच्या मरणानंतर लोकांना उमजले आणि अमर झाले. मरणानंतर अब्जाधीश झालेल्या व्हॅन गॉगने या चित्रांमध्ये आपली अस्वस्थता ओतली, त्याचं गारुड एकेक करीत सगळ्यांना छळत राहीलं. गॉगच्या कुळातील ही अस्वस्थता मग ती चित्ररुपात किंवा काव्यरूपात प्रकट होण्यासाठी धुमसत असते. चित्रात उतरते तीही स्वतःचा ठसा उमटवत आणि कवितेत पाझरते तेही आपल्या कपाळीचा अस्वस्थ भार दुसऱ्याच्या माथ्यावर देण्यासाठी. प्रमोद देखील लिहितोय ते तुमचा माथा शोधीत... तुमच्या माथ्यावरील किलोकिलोची अस्वस्थता मणभर वाढविण्यासाठी. हे अस्वस्थपण त्याचं एकट्याचं नाही, संवेदनशील मन असणाऱ्या प्रत्येकाचं ते आहे. आकाशाखालच्या ज्या ज्या बाबी त्याला छळतात त्यांचं पोस्टमार्टम करीत तो कविता रेखाटतो. तुमच्या मनात अस्वस्थतेची पिल्लं हुंदडायला लागतात यात त्याचं यश आहे.
या कॅनव्हासवरचे आणखी काही रंग आहेत.... स्त्रीवादाच्या, मार्क्सवादाच्या, तुकोबाच्या रोख-ठोक अभंग शैलीच्या, अंधश्रद्धानिर्मूलनाच्या, सत्यशोधनाचा छटा या कॅनव्हासवर गहीऱ्या होतात. यांत्रिक शहराच्या कचाट्यात माणूस हा देखील यंत्राप्रमाणेच ट्रीट केला जातो आहे याचं शल्य या कवितेला आहे. वस्तूंची निर्मिती माणसांच्या गरजा भागविण्यासाठी झाली आहे. वस्तू वापरायच्या असतात आणि माणसांवर प्रेम करायचं असा साधासुधा नियम मानवी जीवनाकरिता आहे. पण सध्या सारंच उलटं झालं आहे. आता वस्तूंवर प्रेम केलं जातं आणि माणसं वापरून फेकली जातात. याबद्दलची चीड आमच्या मनात निर्माण होत नाही मात्र या सर्व प्रकाराला आपण आता ‘यूज्ड टू’ झालो आहोत. यांत्रिकीकरणाने आपल्या संवेदना बोथट केल्या आहेत. अशा काळात एक संवेदनशील मन समाजातलं अकुशल, अमंगल वेचत ते नाहीसं करावं याकरिता धडपडत आहे. हे कौतुकास्पद आहे.......(प्रस्तावनेतून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अस्वस्थाच्या कॅनव्हासवर