दलित कवितेतील मी हा नेहमीच आम्ही असतो. दलित कवी आपल्या समाजाला भोगाव्या लागणाऱ्या वेदना, ताण-तणाव व्यक्त करतात आणि असे व्यक्त करणे अपरिहार्य आहे हे कित्येक समीक्षकांच्या लक्षात येत नाही. दलित कवितेचे आकलन झाले नाही असे मन नाइलाजाने म्हणावे लागते. कलावादी समीक्षकांचा एक आहे की, आत्मनिष्ठा प्रभावी ठरते. तेथे दलित कविता काव्यात्मक ठरते, पण जेथे समूहनिष्ठेला प्राधान्य मिळते तेथे दलित कविता शबल होते असे म्हणणे अपुऱ्या आकलनाचे निदर्शक आहे. दलित कवीचे गाणे ते भोगत असलेल्या दुःखातून उमलते. तो जे एकलेपण, जे दुःख भोगतो ते या समाजव्यवस्थेने निर्माण केले आहे. या कवितेतून व्यक्त होणाऱ्या जीवनानुभवाला सामाजिक संदर्भ आहे. या संदर्भात नरहर कुरुंदकरांचे म्हणणे विचारात घ्यायला हवे. ते म्हणतात- सांस्कृतिक संदर्भाशिवाय अनुभवांना केवळ अनुभव म्हणून कलेच्या क्षेत्रात पकडता येणे शक्यच नसते. प्रत्येक घटनेमागे भावनांचे ताण उभे असतात. त्यांची मूल्ये व संदर्भ जीवनातून येतात. लौकिक पातळीवरील संस्कृतीतून येतात. संस्कृतीने भावनांना स्वार्थनिरपेक्ष आवाहने व आस्वादकता निर्माण केली आहे म्हणूनच वाङ्मयीन व्यवहार शक्य होतो. दलितांची कविता दलित या संज्ञेपलीकडे गेलेली नाही असे म्हणणारे टीकाकार मराठी वाङ्मयात ज्या क्षोभाचे चित्र उमटलेले आहे तो क्षोम वरिष्ठवर्गीय व्यक्तिवादाशी निगडीत असणारा वैयक्तिक असमाधानाचा अविष्कार म्हणून तो कलात्मक असं मानत असतात. दलित कविता समूहाच्या ढोबळ जाणिवांना आकार देत असते असे म्हणणे दलित कवितेला अन्याय करण्यासारखे आहे. गुंतवणुकीसह अनुभव व्यक्त होत असल्यामुळे चीड, संताप व द्वेष इ. विचार मूलात्म अनुभवात मिसळतात आणि अनुभवाचे शब्दलित रुप व्यक्त होते हे ही म्हणणे अन्यायकारक आहे. दलित कवींचा मुळात अनुभवच मुळी या समाजव्यवस्थे विरुध्द घेतलेल्या विद्रोही भूमिकेतून जन्मलेला आहे.दलित कविता हे मराठी साहित्यातील सोसाट्याचे वादळ आहे. ते माणसे पेरीत जाणार, प्रतिगामी प्रवृत्ती पेटवीत राहणार. लहू कानडे यांची कविता या तुफान वादळाचाच एक अंश आहे. क्रांतिपर्व सुरू झाल्याची ही कविता एक खूण आहे.
- डॉ. भालचंद्र दिनकर फडके
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : क्रांतिपर्व