मित्रांनो, धर्माची चर्चा जगातील सर्व समाजात त्यांच्या जन्मापासून सुरू आहे. प्रत्येक धर्मातील अध्यात्म, त्याची जीवनपद्धती, त्याचे धर्मशास्त्र इत्यादींचे निरूपण अनेक वर्षे होत आलेले आहे. धर्माकडे मानवमुक्तीचे, समाजमुक्तीचे एक साधन म्हणून बघितले जात असल्यामुळे धर्मासंबंधीची चर्चा याच दिशेने होत होती. परंतु गेल्या पंधरा-वीस वर्षात या प्रकारची चर्चा होणे जवळ जवळ थांबले आहे. त्याऐवजी कोणाचा धर्म श्रेष्ठ आहे याचे अभिनिवेशी वाद सुरू आहेत. प्रत्येक धर्मसमूह दुसऱ्या धर्मसमूहाशी स्पर्धा करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. धर्माला राजकीय सत्ताप्राप्तीचे आणि इतर धार्मिक समुदायावर वर्चस्व प्राप्त करण्याचे हत्यार मानले जात आहे. त्यासाठी धार्मिक दहशतवाद, विव्देष पसरविणारी वक्तव्ये आणि धर्माच्या नावाने प्रचंड हिंसा केली जात आहे. विसाव्या शतकाचे शेवटचे दशक आणि एकविसाव्या शतकाची सुरुवात ही जगात जणू काही प्रचंड सांस्कृतिक संघर्ष चालू असल्याप्रमाणे युद्धमान बनलेली दिसतात. त्यामुळे आज धर्मचिकित्सेची यापूर्वी कधीही नव्हती एवढी गरज निर्माण झाली आहे. ही चिकित्सा माणसाच्या उदय-विकासाचा, त्याच्या जीवनसंघर्षाचा आणि त्याच्या जगण्यातील मूलभूत समस्यांचा विचार करणाऱ्या विविध आधुनिक ज्ञानशाखांचा साहाय्याने झाली तरच धर्माचे मूळ रूप स्पष्ट होऊ शकेल. त्याचे सामर्थ्य आणि त्याच्या मर्यादांचे आकलन होऊ शकेल. आज धर्माच्या नावाने होत असलेल्या संहाराला थांबविण्याचा तो एक उपाय बनू शकेल…
(पुस्तकातून)
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : धर्म : मानवी संस्कृती व विकास