वामनदादा कईकांची कविता ही आंबेडकरी गेय कवितेचा आरंभबिंदू ठरते. वामनदादा कर्डकांची कविता `लोककविता` नाही कारण या संकल्पनेने तिची नीट ओळख होत नाही. `लोक` प्रवाहाचा रचयिता ज्ञात नसतो. वामनदादाच्या कवितेत संत कवितेप्रमाणे व गझल प्रवाहाप्रमाणे `मक्ता` अथवा `छाप उमटविलेली असते. `नाममुद्रा` शाहीरी परंपरेतही पहावयास मिळते. तात्पर्य या कवितेत रचयिता कवी गीतातूनच कळतो. `लोककविता` म्हणजे वास्तवातील `लोकांची कविता` असा अर्थ खरा ठरत नाही मात्र मराठी वाड्मय कोश ४ (पृ.क्र. ३००) यात दिलेला `लोक`चा अर्थ पाहिला तर त्यातूनही `समाज` ध्वनित होतो. लोकपरंपरा जपणारे लोक अद्याप आहेत. लोक वाड्मय प्रकारही आहेत. गोंधळ, भारुड, लावणी, लळीत इत्यादी प्रकार हाताळणारे समाज असा लोक प्रवाहातील रचनांचा अर्थ घेतला तरीही वामनदादा कर्डकांच्या कवितेचे स्वरूप नीटपणे समोर येत नाही. वामनदादांच्या कवितेत `लोकढंग` आहे मात्र ती `लोककविता` नाही.. वामनदादांची कविता ही आधुनिक आंबेडकरवादी गेय कविता आहे. ही कविता अपूर्व आहे पूर्णतः नवी आहे. ती समकालीन समांतर अशा स्वरूपाची आहे. वामनदादा कर्डकांच्या लेखनाचा काल साधारणत: १९४३ पासून सुरू होतो. या काळापूर्वी `सत्यशोधकी जलसे` व `आंबेडकरी जलसे’ आस्तित्वात होते. जलसेकारांनी आपले `वगनाट्य` सादर करतांना अनेक कवने सादर केली. ही कवने समाजाने ऐकलेली होती. या कवनांना पारंपरिकपणा होता. काहीअंशी या पदरचनांत `दैववाद` आलेला होता. भक्तीपर अथवा व्यक्तिवर्णनपर गीत रचनांत भावनातिरेकाने दैववाद घुसत जात असतो. वामनदादा कर्डकांनी आपल्या रचनेत समग्र बदल घडवून आणला. आशय व सादरीकरणात खूप बदल घडविला व नव्या काळाचं नवं गाणं त्यांनी जन्माला घातलं. वामनदादांच्या पूर्व परंपरेतील शाहीरांपेक्षा त्यांची कविता सर्वार्थाने नवी वाटते. वामनदादांचे समकालीन कवी श्रीधर ओव्हळ, सदानंद वांद्रे, राजानंद गडपायले, धर्मदास मोहिते, नागोराव पाटणकर, दलितानंद, लक्ष्मण केदार, कवी किशोर काकडे, दीनबंधू शेगावकर इत्यादींच्या कवितांवर वामनदादा कर्डकांच्या कवितेचीच छाप पडल्याचे दिसते. वामनदादांनी इतक्या विविध पध्दतीने लिहिले की त्यांची बरोबरी त्यांचे समकालीन कवी कोणीही करु शकले नाहीत. अनेकांनी विनम्रपणे त्यांचे शिष्यत्व पत्करले. वामनदादा कर्डकांनी गेय कवितेचा एक प्रचंड प्रवाह तयार केला. आंबेडकरवादी गेय कवितेचे वामनदादा कर्डक `पितामह` ठरतात!
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : वामनदादा कर्डकांची काव्यसुर