दोन शब्द
अंधश्रध्दा किवा अनिष्ट प्रथा यापूर्वी आणि आताही सातत्याने लेखन होत आहे. काही अनिष्ट प्रथा बदलत्या काळानुसार नव्या चेहऱ्याने पुढे येतात. त्यांची दखल घेऊन त्यांच्याविरोधी प्रबोधन करणे, या प्रथांचे स्वरूप स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठीच माझाही हा एक छोटासा प्रयत्न आहे. अनिष्ट तसेच अघोरी प्रथा इतक्या उदंड झाल्या आहेत की एका पुस्तकात त्या सर्वांची नोंद घेणे अवघड आहे. अंधश्रध्दाविरुद्ध लढणाऱ्या मंडळीना अधिक बळ मिळण्यासाठीही अशा पुस्तकांची आवश्यकता आहे असे मला वाटते. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती माझे स्नेही प्रा. विलास रणसुभे यांनी! बळी प्रथेबाबतचे संदर्भ शोधण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. रात्रभर जागून मला संदर्भ मिळवून देण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या पत्नी राजश्री उर्फ बहिणाबाई यांचीही या कामात मदत झाली आहे. दोघेही माझे स्नेही असले तरी त्यांचे ऋण मानणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या श्राद्ध,भटक्यांचे लग्न,देवदासी आणि नग्नपूजा या तिन्ही पुस्तकांसाठी सकाळचे संपादक विजय कुवळेकर यांची प्रेरणा महत्त्वाची होती. पुस्तकात आपला नामोल्लेख करण्यास त्यांचा विरोध आहे. तो पत्करूनही त्यांचे ऋण व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो. अनिष्ट प्रथांचा शोध घेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात फिरण्याची संधी त्यांनीच मला उपलब्ध करून दिली. अनिष्ट प्रथा या पुस्तकातील काही लेख सकाळमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या लेखांना मिळालेला प्रतिसाद पाहन नवे लेखन करण्याची अधिक इच्छा झाली.ज्येष्ठ संशोधक आदरणीय डॉ. रा. चिं. ढेरे सर यांची आणि माझी तशी ओळख नाही. पण मी जे काही मोडके-तोडके लिहीत आलो, त्या सर्वांचे वाचन त्यांनी केले आहे. लेखनातील उणिवाही सांगितल्या. या पुस्तकाला त्यांनी, आपली प्रकृती ठीक नसतानाही, प्रस्तावना लिहून माझ्यासारख्या नवख्या माणसाच्या पाठीवर ममतेचा हात फिरवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आदरणीय कुसुमाग्रज यांनीही माझ्या छोट्या प्रयत्नाबद्दल दोन शब्द लिहिले त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. तसेच या पुस्तकाची ई .बुक करण्याची जबाबदारी पुस्तकमार्केट डॉट कॉम या वेबपोर्टलने स्वीकारली यासाठी त्यांचेही मनापासून आभार. माझ्या लेखनासंबंधी चर्चा करून प्रोत्साहन देणारे माझे मित्र डॉ. गोपाल गुरू,गबाळचे लेखक दादासाहेब मोरे, प्रा. डी. यू. पवार, कामगार नेते गोविंद पानसरे, माझे मामा श्री. बी. के. कांबळे या सर्वांचे आभार न मानता त्यांच्या ऋणात राहणेच अधिक पसंत करेन. पुस्तकातील उणिवा याचकांनी अवश्य कळवाव्यात,
- उत्तम कांबळे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अनिष्ट्प्रथा