प्रा. मा. रा. लामखडे यांचा आणि माझा स्नेह गेल्या पन्नास वर्षांचा आहे. आमच्या संगमनेर महाविद्यालायातील मराठी विषयाचे व्यासंगी आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.त्यांचा लेखनप्रवास मला नेहमीच भावला आहे. त्यांच्या लेखनातली संशोधनात्मक चिकाटी प्रशंसनीय आहे. त्यांचे लोककलांविषयक लेखन असो की व्यक्तिचित्रणात्मक लेखन असो त्यांची वर्णनात्मक लेखनशैली वाचकाला भावणारी आहे.तथागताच्या वाटेने हे लामखडे यांचे नवे प्रवासवर्णन भारताचे वैभव असणाऱ्या गौतम बुद्धांच्या पाऊलवाटांना प्रकाशमान करणारे आहे. त्यांचे हे पुस्तक भारतीय लोकजीवनात रुजलेल्या बुद्धांच्या तत्त्वज्ञानाला आणि ऐतिहासिक अस्तित्वाला वैश्विक करणारे आहे.भारतभर भटकंती करणे हा लामखडे यांचा आवडता छंद आहे. भारताच्या गंगाजमनी संस्कृतीचे दर्शन त्यांच्या प्रवासवर्णनातून घडते. त्यांची दांडगी निरीक्षणदृष्टी आणि प्रवाही लेखनशैली या दोन्हींचा सुरेख संगम या ग्रंथात दिसतो. मराठी साहित्यातून प्रवासवर्णन हा लेखनप्रकार लुप्त होत असताना प्रा. लामखडे यांचे हे पुस्तक प्रकाशित होणे म्हणजे या लेखन प्रकाराला आणि तथागत गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने गौरवशाली बनलेल्या भारतीय सांस्कृतिक स्थळांना प्रकाशात आणणे आहे. हा ग्रंथ तथागतांच्या अस्तित्वाकडे जात-धर्मापलीकडे पाहण्याची नैसर्गिक मानवी दृष्टी देतो, हे लामखडे यांच्या ग्रंथाचे बलस्थान आहे. आजच्या युद्धजन्य आणि भेदरलेल्या परिस्थितीत हा ग्रंथ मराठी वाचकांना सम्यक् व विवेकी दृष्टी देईल असा विश्वास वाटतो. -रावसाहेब कसबे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : तथागताच्या वाटेने