प्रा. लामखडे यांच्या लिखाणाचा मी फॅन आहे. काही काळापूर्वी मी येवला येथे राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले पैठणीचे कलाकार श्री. शांतीलाल भांडगे यांच्याकडे गेलो व नक्षीदार पैठण्यांची कला पाहून थक्क झालो. यावेळी `लोकपरंपरेची सत्त्वधारा` हे प्रा. लामखडे यांचे नवीन पुस्तक वाचताना मी त्या पैठणीला पुन्हा स्पर्श करीत आहे असे वाटू लागले. पुस्तकाने भरजरी पैठणीचे स्मरण करून द्यावे ही गोष्ट विलक्षण आहे. मुलायम रेशमी स्पर्श व गंध, पैठणीवरील नजाकतीने विणलेले मोर व झुळझुळणाऱ्या गर्भरेशमी सहवासातील सौख्य यांचा पुनःप्रत्यय मला हे पुस्तक वाचताना आला. प्रा. लामखडे यांचे लेखन त्यातील तम्भयता, ध विवेचन, लोकपरंपरेचा भक्तिभाव, मन गुंतवून टाकणारी लेखनशैली व अनेकविध संदर्भ यांनी नटलेले आहे. आपण जणू त्यांच्याबरोबरच दऱ्याखोऱ्यांत हिंडून वाद्यांच्या तालावर गायली जाणारी लोकपरंपरेतील लोकगीते ऐकतो असेच वाटू लागते. त्यातील हृदयाला भिडणारा नाद, मुक्त स्वर, सामुदायिक पदन्यास व निसर्गाच्या सहवासातील धुंदी यात कसे गुंतून जातो हे कळतच नाही. लोकपरंपरा व लेखकाची प्रतिभा एकत्रित आल्यावर किती व कसे सौंदर्य निर्माण होऊ शकते याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे `लोकपरंपरेची सत्त्वधारा` हे पुस्तक आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : लोकपरंपरेची सत्त्वधारा