`आदिवासी जीवन, संस्कृती आणि साहित्य` हा ग. शां. पंडित यांचा ग्रंथ आदिवासींची समग्र सांस्कृतिकता कवेत घेणारी साहित्यकृती आहे. `हाकारा` या आदिवासींच्या मासिकाचे संपादन पंडितांनी अनेक वर्षे केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जीवन, साहित्य व संस्कृतीचा जवळून वेध घेण्याची संधी त्यांना मिळाली. त्याच अनुभवावर व अभ्यासावर या ग्रंथाची समग्रता त्यांनी पेलून नेलीय. `हाकारा` ची सोबत आणि संपादक म्हणून त्यांनी सुमारे ३० वर्षे काम पाहिले आहे, म्हणूनच आदिवासींचे सर्वार्थाचे `अंतरंग` आकळण्याचे सामर्थ्य या लेखकात आले.या ग्रंथात प्रमुख आदिवासी भिल्ल, कोळी, ठाकर, वारली, आंध, कातकरी, कोकणा, गोंड, कोरकू, माडिया गोंड, कोलाम, परधान, पारधी या जमातींचा धावता परिचय आढळतो. केवळ परिचय करून देण्यापर्यंत लेखक थांबत नाही, तर आदिवासींच्या विकासाचे प्रश्नही ते अभ्यासपूर्वक मांडतात. प्रदीर्घ व्यासंग आणि अनुभव असल्याने लेखक पंडित आदिवासी समाजाच्या विकासाच्या दिशा स्पष्ट करू शकले आहेत.आदिवासी साहित्याची निर्मिती व त्याच्या प्रेरणांचा सूक्ष्म अभ्यास व `आदिवासी साहित्य` कशाला म्हणावे ? या प्रश्नाची लेखकाने केलेली चर्चा उद्बोधक आहे. आदिवासी साहित्याची वाटचाल, साहित्य संमेलने, दलित-आदिवासी-ग्रामीण संमेलने, उलगुलानवेध संमेलने, आदिवासी महिला संमेलन, मेळावे, कार्यकर्ता शिबिरे यासंबंधीचे लेखकाचे विश्लेषण अत्यंत मौलिक आहे. या ग्रंथात आदिवासी लेखकांच्या मानदंडाची देखील नोंद आहे. बिगर आदिवासीमध्येही संवेदना आणि विवेक असतो, याचे दर्शन ग. शां. पंडितांच्या या ग्रंथलेखनातून होते.
- डॉ. श्रीपाल सबनीस
मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आदिवासी जीवन, संस्कृती आणि साहित्य