एक कैफियत` हा डॉ. बाळासाहेब लबडे (गुहागर, जि. रत्नागिरी) ह्यांचा `महाद्वार` आणि `मुंबई.. बंबई.. बॉम्बे` ह्या गाजलेल्या दोन कवितासंग्रहांनंतरचा तिसरा कवितासंग्रह आणि पहिलाच गझलसंग्रह असून तो रसिकांच्या भेटीला आला आहे. ह्या संग्रहाच्या रूपानं डॉ. लबडे ह्यांनी मराठी गझलेच्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकलं आहे. मराठी गझल विपुल प्रमाणात लिहिली जात आहे. त्या परंपरेस समृद्ध करणारी ही गझल आहे.
कैफियत मांडताना त्यांनी ती टोकदार भाषेतनं मांडली आहे. ही गझल उपरोध, उपहास, मिश्किलपणा, सडेतोडपणा ह्यांनी युक्त असून नवा ढंग आणि नावीन्यपूर्ण आविष्कार करत तिनं गझलकाराच्या अंतरीची सल/फिर्याद अनेकविध वृत्तांमधून मांडली आहे. मानवी जीवनाच्या अनेकविध पैलूंना आपल्या कवेत घेताना ती सर्व नव्या परिवर्तनवादी, सामाजिक बांधीलकीच्या, सर्जनात्मक, जाणिवांना प्रतिमा, प्रतीक, रूपक ह्यांच्या माध्यमातून मांडते. तिचा अधिक भाव हा वास्तववादी आहे. मानवी जीवनातील सत्याच्या अधिक जवळ जाण्याचा ती प्रयत्न करते. ही गझल मानवी संवेदनांना आवाहन करून ती रसिकांच्या मनात विचार आणि भावना ह्यांचे तरंग निर्माण करते. ती नव्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक व्यवस्थेचा पुरस्कार करते. डॉ. लबडे ह्यांनी योजलेल्या वृत्तांमध्ये विविधता आहे. तसेच बहारदार लयीचा प्रत्ययही त्यांची गझल देते. अशी ही त्यांची गझल कोणत्याही प्रभावापासून मुक्त आहे.
ती परस्परविरोधी भावनांना चपखलपणे पकडते. कोणताही विषय तिला वर्ज्य नाही. ती संवादी, संवेदनशील आणि काळाची सहप्रवासी अशी आहे. वाचताना तिचा आतला आवाज जाणवतो, ही ह्या गझलेची जिंदादिली आहे. मराठी गझलेला समृद्ध करणाऱ्या, आपल्या वेगळ्या जाणिवांचा ठसा उमटवणाऱ्या ह्या गझलेबद्दल `वाह ! क्या बात है !`, असं म्हटलं नाही, तरच नवल ! अशा ह्या गझलसंग्रहाचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा !
- प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : एक कैफियत