क्रांतीची अक्षरे बाबासाहेबांनी इतिहासाच्या पानावर कोरली. त्या कार्याविषयीची कृतज्ञतापर कविता होणे, हे आम्हा सर्व बुद्धभूमीतील प्रज्ञासूर्याच्या लेकरांची निर्मळ भावना आहे.‘पृथ्वीच्या ओंजळीत पेरलीस मानवता’ ही भूमिका किती व्यापक आहे, हे दिसून येते. मानवतत्त्वाला पुरून उरणारे बाबासाहेब हा आमच्या महाकाव्याचाच विषय आहे. असे दीर्घकाव्य लालित्याचा साज लेवून आणि विचारांची भक्कम भूमिका मांडत उभे आहे. म्हणूनच ही कविता म्हणते, ‘इतिहासही तुझ्या नावानं समृद्ध झाला’ ही विचार, चरित्र आणि बाबासाहेबांच्या उजेडाचा परिघ मांडणारी कविता आहे. परिवर्तनाच्या कवितेला शब्दात येताना संयमानं सूर्याचं तेज अधोरेखित व्हावं आणि या सूर्याची प्रखरता प्रत्येकाच्या काळजात ठिणगीसारखी नाही, तर फुलासारखी फुलावी हीच या कवितेची भूमिका आहे. प्रज्ञासूर्याला अंत:करणात फुलवणाऱ्या या भावशब्दांच्या मांडणीत बाबासाहेबांचं ‘साहेब’पण शब्दशब्दांतून पाझरत राहतं. एका महाविश्वनायकाच्या चरित्राची आणि कर्तृत्वाची विचारकविता व्हावी. संशोधनातून बाबासाहेब जसे आकलनात येतात, तसे कवितेतूनही येतात. अनेक शाहीर, कवी आणि कलावंतांनी आपली कला बाबासाहेबांच्या पायावर अर्पण करत झिजावं असं युगप्रवर्तक कार्य आहे हे. ते शब्दात पकडणं तसं अवघडच. बाबासाहेब जिवातला जीव झाले की त्यांच्याविषयीचे शब्द हे आपोआपच उमलून येतात. बहुुजनांच्या अंत:करणातील भावनेचं प्रतीक म्हणूनही ही दीर्घकविता आपल्या स्मृतीत तरंगत राहते. बाबासाहेब मोठे आहेत, त्यांचे कार्य इथल्या अंधाराला हाकलून लावणारे आहे, हे सगळं शब्दात मावत नाही, तेव्हा त्याची कविताच होते. जे जे त्यांच्याविषयी लिहिले गेले ते कृतज्ञतेचा मोहोर बनूनच लाखोंच्या मेंदूत स्थिर झाले. या कवितेला फक्त साहित्यिक मूल्यांच्या कप्प्यात बांधून तिचे मूल्यमापन करता येणार नाही, तर बुद्धभूषण साळवे यांची ही कविता एकूणच आपल्या सगळ्यांच्या अंत:करणात एक बुद्धफूल उमलावे तशी घटना आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : तू शतकांतराचा एल्गार