या आधी मी लिहिलेल्या `नाइन इलेव्हन` या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याची विनंती करण्यासाठी मी डिसेंबर २०१८ मध्ये ज्येष्ठ पत्रकार श्री. हेमंत देसाई यांना भेटण्यासाठी त्यांच्या पुण्यातील घरी गेलो होतो. गप्पांच्या ओघात बँकेतील कामासंदर्भात विषय निघाला. `एका बँकरची डायरी` या माझ्या पुस्तकाबाबतही त्यांना ठाऊक होते. मी बरीच वर्षे कर्ज विभागात आणि विशेषतः लघू व मध्यम उद्योगांच्या कर्जाचे कामकाज पाहिले आहे हे कळल्यावर, लघू व मध्यम उद्योजकांच्या बऱ्याच समस्या आहेत, त्यांच्या उपयोगी पडेल, असे पुस्तक मी लिहावे, असे त्यांनी मला गप्पांच्या ओघात सुचविले. तेव्हांपासून हा विषय माझ्या डोक्यात घोळत राहिला. लघू व मध्यम उद्योजकांच्या अनेकविध समस्या आहेत आणि त्यांचे विश्लेषण किंवा मीमांसा करायची तर सरकारी धोरणे, शासकीय यंत्रणेतील कामाची दिरंगाई, ढिसाळपणा, बँकेकडून पतपुरवठा मिळविण्यातील अडिअडचणी, मोठ्या उद्योजकांकडून होणारी मुस्कटदाबी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी, वस्तू आणि सेवा यांच्या गरजेत होत जाणारे बदल, असे कितीतरी वेगवेगळे घटक कारणीभूत किंवा अंर्तभूत आहेत. या संदर्भात अधिकारवाणीने काही सांगण्याएवढा माझा अभ्यास नाही. तथापि, बँकेतील नोकरी आणि नंतर स्वतंत्र सल्लागार म्हणून काम करत असताना सुमारे ३२ वर्षांच्या अनुभवांचे एक भले मोठे गाठोडे माझ्या जमाखाती जमा आहे. त्या प्रत्येक अनुभवातून काही धडा घ्यावा आणि तो मनाच्या किंवा बुद्धीच्या कप्प्यात जपून ठेवावा असा निश्चित आहे. त्या अनुभवांचा उपयोग व्यावसायिकांना, उद्योजकांनाही होईल आणि बँकर्सनांही होईल. इतर वाचकांनाही हे अनुभव कथन मनोरंजक वाटेल, असा विश्वास वाटतो.
- संजय कात्रे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांच्या कथा आणि व्यथा