निशाणी डावा अंगठा, रमेश इंगळे उत्रादकरांची, साक्षरता अभियानावर लिहिलेली गाजलेली कादंबरी, तिरकस विनोद आणि उपहास ही या कादंबरीची वैशिष्ट्ये. मी मुंबई विद्यापीठातल्या ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्’ मध्ये व्हीझिटींग लेक्चरर म्हणून शिकवायला जात होतो. त्याचवेळेस मी ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ ह्या त्यांच्या नाट्यविभागातल्या विद्यार्थ्यांसाठी बसवायला नाटक शोधत होतो. आमचे मंगेश बनसोड सर मुंबई विद्यापीठात नाट्यविभागात प्रोफेसर आहेत. त्यांच्याशी बोलता बोलता मला असं कळलं की, त्यांनी ‘निशाणी डावा अंगठा’चं नाट्यरूपांतर केलंय. मी लगेच वाचायला मागितलं, मला फारच आवडलं, मी ‘ललित’च्या विद्यार्थ्यांसाठी नाटकाचा प्रयोग करण्याची परवानगी मागितली, बनसोड सरांनी आनंदाने दिली. मंगेशचं नाट्यरूपांतर, कमानी रंगमंचाची चौकट मोडूनच डोळ्यासमोर आलं, त्यामुळे त्याचा प्रयोग आम्ही ललित कला केंद्रामधल्या खुल्या मंचावर केला, त्यामुळे त्याला आपोआपच गावाचा पोत मिळाला आणि प्रयोगाच्या दृष्यपरिणामात फरक पडला. कादंबरीचं नाट्यरूपांतर कसं असावं, म्हणजे कादंबरीतली बलस्थाने तशीच ठेवून रंगमंचाची बलस्थाने वापरून त्याचं माध्यमांतर झालं आहे. हे ह्या नाट्यरूपांतराचे वैशिष्ट्य आहे. ‘निशाणी डावा अंगठा’मध्ये गाणी वापरण्याची संधी मंगेशने त्याच्या नाट्यरूपांतरातच करून ठेवली, त्यामुळे आमच्या ‘ललित कला’च्या प्रयोगात आम्ही नाटक पोहोचवायला लोककलांचा वापर केला होता, त्याने मूळ कादंबरीतला उपहास पोहचायला मदत झाली. मंगेशने नाट्यरूपांतर उत्तम केलंय. प्रयोगासाठी जी रंगावृत्ती केली आहे ती मूळ कादंबरीतला गाभा हरवू न देता करणे अवघड होतं. प्रयोग बांधायला त्यामुळे मजा आली होती. कादंबरीचं नाटक कसं करावं, ह्याचं ‘निशाणी डावा अंगठा’ हे उत्तम उदाहरण आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : निशाणी डावा अंगठा