मला शान्ता शेळके यांची खूप ठसठशीत अशी आठवण या प्रसंगी सांगावीशी वाटते. मी १९६२ मध्ये पहिल्यांदा आमदार झातेः त्यावेळी आम्ही आमदार निवासात राहत होतो. काँग्रेसच्या प्रमुख कमलताई विचारे होत्या. आणि त्या तिथे येऊन आम्हा आमदार भगिनींना अधूनमधून भेटत असत. एक दिवस त्यांनी मयुरा या आमदार निवासात शान्ता शेळके यांना बोलाविले होते. त्यात मला आणि इतर महिला आमदारांनाही शांता शेळके यांना भेटण्यासाठी बोलाविले होते. म्हणून मी तेथे गेले आणि तेथे माझी आणि त्यांची पहिल्यांदा भेट झाली.
शान्ता शेळके यांचं व्यक्तिमत्व फार वेगळं होतं. छान मोठे डोळे, जाड फ्रेमचा चष्मा, डोक्यावरून पदर आणि मोठ्ठ कुंकू. मला त्यांची कवयित्री म्हणून ओळख करुन देण्यात आली तेव्हा `अशा प्रकारची कवयित्री?` हा विचार मनात येऊन मला थोडंसं वेगळंच वाटलं. कारण माझ्या कवयित्रीबद्दलच्या कल्पना काही वेगळ्या होत्या.
आम्ही खूपशा गप्पा करायला लागलो तेव्हा, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे, हे माझ्या लक्षात आलं आणि वाटलं की, त्या कवयित्री आहेत त्यामुळे असा त्यांचा दृष्टिकोन असणं स्वाभाविक आहे. कारण सर्वसाधारण व्यक्ती असा दृष्टिकोन ठेवू शकणार नाही.
त्यामुळे हे त्यांचं व्यक्तिमत्व माझ्या लक्षात आलं आणि लक्षात राहिलं. यावेळी मला त्यांच्या या व्यक्तिमत्वाची आठवण होते.
त्यांनी म्हटले आहे की,"मी तटस्थ संथपणे अजमावीत आसमंत मी तटस्थ, खेद नसे नाही खंत..." हा त्यांचा स्वभाव मला जाणवला आणि तो त्यांच्या या कवितेत आलेला आहे. म्हणून मी त्यांची `मी तटस्थ` ही कविता निवडलेली आहे. ही कविता त्यांच्या विचारांशी मिळतीजुळती आहे असे मला वाटते.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : बकुलगंध