स्नेहा विठ्ठल कदमचे बालपणापासूनच कवितेशी भावनिक नाते जुळले आहे. आपल्या अवतीभवतीच्या सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींकडे सजगपणे पाहत कवितेतून प्रतिक्रिया देण्याचा ध्यास तिने घेतला आहे. `शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून` हा तिचा पहिला संग्रहदेखील याची प्रचिती आणून देतो. तिच्या कवितेसोबतच तिच्यातील कवयित्रीचीही समृद्ध वाढ होत गेली आहे. तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भक्कम विचार-वारशाची डोळस जोड तिच्या कवितेला मिळाली आहे, हे यामागील प्रमुख कारण आहे. स्त्री म्हणून जगत असताना जातीयवादी पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेकडून आलेल्या अनुभवांविषयी बेडरपणे बोलण्याचे धाडस ती दाखवू शकते, यामागेही हाच समृद्ध विचारवारसा आहे. त्यामुळेच, या सनातनी व्यवस्थेने लादलेली पारंपरिक चौकट मोडून टाकून `वेलीनेच आता झाड बनलं पाहिजे` असं उच्चरवात सांगण्याचा आत्मविश्वास तिच्यामध्ये आला आहे. पिढ्यानपिढ्या डोकीवर तुलसी वृंदावन घेऊन शेकडो मैल चालत पंढरीची वारी करणाऱ्या बायांना, तुम्ही चंद्रभागेशी कधी हितगूज केलंय का, असा स्वतःत डोकावायला लावणारा, अंतर्मुख करणारा सवाल विचारत हजारो वर्षांच्या विषमतेचा कचरा लोटू पाहणाऱ्या जनाईच्या अभंगांशी ती स्वतःला जोडून घेऊ पाहते, तेव्हाच या कवितेचे समस्त स्त्रियांच्या दुःख आणि वेदनेशी असलेले नाते ठळक होते. दुःखवेदनेशी जखडलेल्या या स्त्रियांना स्वयंपूर्ण बनवायला एखादा आपुलकीचा आस्थेवाईक किरणही पुरेसा आहे, याचेही भान तिला आहे. आज मराठीत लिहिल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या कवितेत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची शक्यता असलेली ही कविता आहे. भविष्यात जिच्याकडून निश्चितच आशा बाळगता येईल अशी एक तरुण कवयित्री या कवितासंग्रहाच्या माध्यमातून आपल्यासमोर येते आहे. या कवितांच्या सच्च्या भावविश्वाचे आपण मोकळेपणाने स्वागत करायला हवे असे मला वाटते.
- प्रवीण दशरथ बांदेकर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून