भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गौरवतोच, पण त्यांच्या जीवनातील सर्वात गौरवशाली पर्व आहे ते हिंदू कोड बिल संघर्षाचे. भारतीय हिंदू स्त्रियांना हजारो वर्षांच्या भीषण अंधःकारातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले. या बिलामुळे प्रत्येक स्त्रीला विवाह, वारसा, याबरोबरच दत्तकविधान, उत्तराधिकार, पोटगी, घटस्फोट यासंबंधीचे महत्त्वपूर्ण अधिकार मिळणार होते. `आंबेडकर स्मृती` म्हणून ओळखले जाणारे हे बिल डॉ. आंबेडकरांना राज्यघटनेपेक्षाही महत्त्वाचे वाटत होते. कारण अतिशूद्र ठरविल्या गेलेल्या सर्व वर्षांच्या स्त्रियांचे ते मुक्तिगीत होते. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले असले तरी बहुसंख्य समाज परंपरावादी,सामाजिक, धार्मिक गुलामगिरीत अडकला होता. या बिलाच्या निमित्ताने डॉ. आंबेडकरांनी सामाजिक स्वातंत्र्याच्या संघर्षाला तोंड फोडले. साहजिकच या बिलाला सर्व थरांतून, अगदी स्त्रियांकडूनही विरोधच झाला. संसदेत आणि वृत्तपत्रांतून विचारांचे, आरोप-प्रत्यारोपाचे एवढे रणकंदन माजले की पंडित नेहरूंनाही माघार घ्यावी लागली. हे बिल संसदेत संमत न झाल्याने अखेर डॉ. आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : प्राचीन अर्वाचीन भारतीय स्त्री आणि हिंदू काडबिल