आजच्या यंत्रयुगात माणूस एके ठिकाणी स्थिर असा राहिलेला नाही. सतत धावपळ करीत राहणं, मानेवर जोखड घेऊन धकाधकीचं आयुष्य कंठणं हा त्याचा स्थायीभाव झालेला आहे. जगाच्या भौतिक प्रगतिनुसार आपलीही पाऊले वेगवान पडली पाहिजेत. त्यांना जे जे गवसते आहे ते ते आपल्यालाही गवसायला हवे, किंबहुना ते पारे अगदी कमी परिश्रमात गवसायला हवे, यासाठी आजचा माणूस `शॉर्टकट` शोधू पाहतोय, चटकन मोठे होण्याच्या नादात अमानवी शिडीचा वापर करू पाहतोय. `द्रव्येण सर्वे वशः` हे सूत्र मनी बिंबवून तो आज सैरभैर होऊन धावत सुटला आहे.
ही कादंबरी अशाच मनोवृत्तीचा मागोवा घेणारी आहे. चिखलात कमळ उगावे असा एखादा केशवमूर्तीसारखा सत्शील वृत्तीचा, आदर्शवादी साहित्यिक आजच्या गढूळ समाजात अभावाने का होईना भेटू शकतो. तो आपले उत्तम विचार समाजसुधारणेच्या भूमिकेतून, आपल्या विपुल साहित्यातून मांडत असतो. परंतु त्याचे हे आदर्शवादी व्यक्तिमत्त्व कुचकामी करण्यासाठी एक कंपू सतत प्रयत्नशील असतो. हा कंपू अनेक तन्हेने त्याची निर्भर्त्सना करीत असतो किंबहुना त्याचे कौटुंबिक जीवनच उध्वस्त करू पाहतो पण शेवटी `धर्मो रक्षति रक्षितः` या सुक्तीप्रमाणे केशवमूर्ती सारख्या सत्शील साहित्यिकाच्या आदर्श विचारांचा विजय होतो.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : एका पंडितचे मृत्युपत्र