भारतीय मुस्लिम समाजात दलित आहेत, आदिवासी आहेत, शेतकरी आहेत, कारागिरी आणि जातव्यवसाय गेलेले कामगार, मजूर, स्त्री-पुरूष आहेत. ते धर्मांतिरत आहेत. धर्मांतर केल्याने नव्हे, करावे लागल्याने मुसलमान परके, राष्ट्रद्रोही, दहशतवादी, गुंड, नमकहराम कसे काय ठरतात? मागे सोडून दिलेला, टाकून दिलेला मुसलमान, संशयाने, द्वेषाने येणाऱ्या प्रत्येक संधीपासून वंचित राहून दलिताहूनही अधिक दलित झाला. त्याची मुस्लिम चेतना दलित-चेतनेसारखी माणूसकीची पहाट शोधणारी आहे. दलित ग्रामीण आदिवासी साहित्याप्रमाणे मुस्लिम मराठी साहित्याचाही प्रवाह आहे. या साहित्य प्रवाहाला मुस्लिम लोकवाड्मयाची, मुस्लिम संत साहित्याची आणि मुस्लिम शाहिरी वाङ्मयाची परंपरा आहे.भारतात दलितांविषयी उपेक्षाभाव आहे. मुसलमानांविषयी द्वेषमूलक संशय आहे, आदिवासींविषयी ते निर्बुध्द, अडाणी असल्याची भावना आहे, स्त्रीविषयी स्त्री ही एक उपभोग्य वस्तू असल्याचा आणि निव्वळ शेतीवर जगणारे शेतकरी म्हणजे अदखलपात्र गुन्हेगार आहेत, अशी एक सार्वत्रिक, सर्रास भावना आहे. हीच तर भारतीय मानसिकता आहे. ही मानसिकता पुसून टाकण्याचे प्रयत्न दलित आदिवासी, मुस्लिम, स्त्री आणि ग्रामीण शेतकऱ्यांमधील संवेदनशील लेखक, कलावंत करीत आहेत. या लेखक, कलावंतानी आपापल्या समाज घटकांच्या जाणिवांचे उत्खनन करुन साहित्य निर्मिती केली आहे. म्हणून तर त्या त्या घटकांचे साहित्य प्रवाह निर्माण झाले आहेत. आता, आता पर्यंत हे समाज घटक मूक होते, भूमिगत होते. देवा धर्माच्या नावावर त्यांना हजारो वर्षापासून दडपण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हे साहित्य प्रवाह म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीची फार मोठी उपलब्धी आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मुस्लिम मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप