सोलापूर येथील मातंग वस्तीत बालपण व्यतीत केलेल्या व कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर पदव्युत्तर पातळीवरचे शिक्षण घेऊन भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या ल. सि. जाधव यांचे हे आत्मकथन वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारे तसेच साहित्यकृतीचा आल्हाददायक अनुभव देणारे आहे.
श्री जाधव यांनी आपल्या आत्मकथनात मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टीने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. निसर्गातील विविधतेचा ते तरल संवेदनशीलतेने अनुभव घेतात हे त्यांचे असाधारण वैशिष्ट्य म्हणावे लागेल. हीच संवेदनशीलता ते समाजातील घटना अथवा व्यक्तिजीवनातील दारुणता चित्रित करतानाही प्रकट करतात.
श्री.ल.सि.जाधव यांची व्यापक जीवनदृष्टी, सामाजिकतेची प्रगल्भ समज, प्रसंग वा भावस्थितीचे प्रत्ययकारी चित्रण करण्याचे सामर्थ्य, प्रसादपूर्ण ओघवती भाषाशैली आणि निसर्गाचा अनुभव घेणारी तरल संवेदनशीलता या साऱ्या गुणांमुळे त्यांचे हे आत्मकथन केवळ दलित आत्मकथनातच नव्हे, तर एकंदरीतच मराठी आत्मकथनपर वाङ्मयात मोलाची भर घालणारे आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : होरपळ