`झपूर्झा`चा पहिला भाग अर्धा-पाऊण झाला असतानाच त्यात आपण अनेक लेखकांवर लिहू न शकल्याची मनामध्ये कुठेतरी बोच होतीच. उदाहरणार्थ, थॉमस हाडीं, डी. एच. लॉरेन्स, आर्थर मिलर, सॅम्युएल बेकेट, माक्वेंझ, नेरुडा या सगळ्या मंडळींवर लिहायचं राहूनच गेलं होतं. मग `झपूर्झा`चा पुढचा खंड लिहायचं ठरलं. ते लिहायचं ठरल्यावर मला वाटलं की ही दोन्ही पुस्तकं एकाच वेळी प्रकाशित झाली, तर खूपच चांगलं होईल. पण मग वेळेअभावी मला एकट्याला ते करणं शक्य नव्हतं. मग मला हे सहलेखनामुळे शक्य होईल असं वाटलं आणि नीलांबरी जोशीचंच नाव डोक्यात आलं. नीलांबरीला इंग्रजी साहित्याची खोलवर आवड असल्याचं मी जाणूनच होतो. तिचं वाचनही दांडगं होतं हेही मला ठाऊक होतं. पण जेव्हा मी हा विषय तिच्यापाशी चाचपडून बघितला, तेव्हा तर तिनं अनेक इंग्रजी कविता मला घडाघडा म्हणूनच दाखवल्या. मी चाटच पडलो ! त्यानंतरच्या चर्चामधून मला तिची या विषयातली इनसाईट लक्षात आली आणि तेव्हाच मी तिला सहलेखिका म्हणून घ्यायचं ठरवलं. या पुस्तकातलेही काही लेख माझ्या पूर्वीच्या वर्तमानपत्राच्या मालिकेत आलेले होते. त्यात तर तिनं भर टाकलीच, पण इतर अनेक लेख अतिशय सुंदर तन्हेनं लिहिले. शेवटी मला लक्षात आलं की सहलेखनामुळे झपूर्झाचा हा खंड फक्त वेळेत पूर्ण होऊ शकला. एवढंच नव्हे तर त्याचा दर्जाही खूपच सुधारला. जर हे पुस्तक चांगलं झालं असेल, तर त्याचं श्रेय मी मुख्यत्वेकरून नीलांबरीलाच देईन.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : झपूर्झा