क्रांतिविचार आणि क्रांतिकार्य यांची एकमयता म्हणजे जोतीराव फुले । निसर्गात झाडे, त्यांची पाने, फुले, रंग, गंध यांची अथांग विविधता आहे पण विषमता वा विरोध नाही. झाडे परस्परांचा द्वेष करीत नाहीत आणि परस्परांशी भांडतही नाहीत. अशा समाजाचे स्वप्न जोतीरावांनी बघितले. विविधतेची अनेकमयताही हवी आणि मानवी सौहार्दाची एकमयताही हवी असे त्यांना वाटत होते. जाती म्हणजे अनेकमयता, धर्म म्हणजे अनेकमयता आणि स्त्रीपुरुष गौणप्रधानता म्हणजेही अनेकमयता, अशा सर्व भेदांच्या पलीकडे गेलेले आणि निरुपाधिक झालेले समाजपण म्हणजे एकमयता। जोतीराव म्हणतात-"कोणत्याही कुटुंबातील एका मानव खीने बौद्धधर्म पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिने तो धर्म स्वीकारावा व त्याच कुटुंबातील तिच्या पतीने जुना व नवा करार वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने ख्रिस्ती व्हावे व त्याच कुटुंबातील त्याच्या कन्येने कुराण वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिने महंमदी धर्मी व्हावे आणि त्याच कुटुंबातील त्याच्या पुत्राने सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे आणि या सर्व मातापित्यासह कन्यापुत्रांनी आपला प्रपंच करीत असता प्रत्येकाने कोणी कोणाचा द्वेष करू नये." या एकमयतेच्या सिद्धांतालाच यशवंत मनोहर यांनी "संग्रामनायक जोतीराव फुले" हे नाव कृतज्ञतापूर्वक दिले आहे.
- यशवंत मनोहर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : संग्रामनायक जोतीराव फुले