भारतीय रंगभूमीच्या परंपरेत लोकरंगभूमीचा महत्वाचा वाटा राहिला आहे. आणि हीच लोकरंगभूमी नागर रंगभूमीचीही जननी राहिली आहे. संस्कृत रंगभूमीपासून सुरु झालेली नागर रंगमंचाची परंपरा भारतीय रंगभूमीची सुरुवात मानली जाते. अश्वघोष, भास, भवभूती, कालिदास, शूद्रक या नाटककारांनी अभिजात नाटके संस्कृत रंगभूमीला दिलीत. त्यानंतर ह्या भूमीत रुजली ती इंग्रजी, पारसी, हिंदी, मराठी नि गुजराती रंगभूमी ! पारसी, हिंदी आणि मराठी रंगभूमीची सुरवात एकोणविसाव्या शतकाच्या मध्यावर जवळपास आगे-मागेच झालेली दिसून येते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदी नाटकाला खऱ्या अर्थाने स्वतःचा चेहरा गवसला. इब्राहीम अल्काजी सारख्या रंगतपस्वीने राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि जगात भारतीय नाटकाची ओळख निर्माण झाली. रंगमंचावर सतत नवनवीन प्रयोग आणि नव्या आशय-विषयाची नाटके अल्काजींनी सादर केली. आषाढ का एक दिन, अंधा युग, तुघलक अशी एकाहून एक सरस 50 हून अधिक नाटके त्यांनी दिग्दर्शित केली आणि भारतीय रंगभूमीला स्वतःचा चेहरा मिळवून दिला. हिंदी नाटकाला जगात ओळख निर्माण करून देण्यासाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे योगदान फार मोलाचे ठरले. ह्याच राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने पुढे मनहर सिंग, ओम शिवपुरी, कमलाकर सोनटक्के, के.एन. पन्नीकर, मोहन महर्षी, राम गोपाल बजाज, नसिरुद्दीन शहा, ओम पुरी, रुद्रप्रसाद सेनगुप्ता, रतन थियाम, जयदेव हट्टंगडी, सुरेखा सिकरी, सई परांजपे, बन्सी कौल, भानू भारती, एम.के. रैना, रोहिणी हट्टंगडी ते वामन केंद्रे यांच्यापर्यंत असे एक ना अनेक रंगकर्मी देशाला दिलेत.यापुढच्या नव्या रंगभाषेच्या शोधात...`रंगविधा`!
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : रंगविधा