१५ मे २००४ रोजी स्वतःला `मी वादळवारा` म्हणणारा एक महान प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. वामनदादांचे जगणे आता त्यांच्या गीतांमधून सुरू झाले. त्यांना त्यांच्या गीतांमधून पाहता येईल. त्यांच्या गीतांमधून त्यांना भेटता येईल आणि त्यांच्याशी बोलताही येईल. मृत्यूने त्यांचे केवळ अस्तित्वांतर झाले. एका हाडामांसाच्या देहात ते होते आता त्यांनी आपल्या गीतांचा देह धारण केला. हे वामनदादांचे सांस्कृतिक पुनर्वसनच होय.वामनदादांचे आणि माझे संबंध १९६७ पासूनचे । `माझ्या जीवनाचं गाणं` या पुस्तकात वामनदादांनी "पैठण येथेच एक थोर कवी डॉ. यशवंत मनोहर यांची ओळख झाली. आपलेपणा वाढला. तो अजूनही जसाच्या तसाच आहे." असे लिहिले आहे. या आपलेपणाचा आज विशेषच गौरव वाटतो."विद्रोही गीतकार : वामनदादा" हा माझा पहिला लेख २५-२६ एप्रिल १९९८ रोजी कुर्ली येथे झालेल्या फुले-आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत प्रकाशित झाला. त्यानंतर उत्तम सोनकांबळे यांनी "समग्र वामनदादा कर्डक" (खंड पहिला) प्रकाशित केला. मी दीर्घ प्रस्तावना लिहिली. त्यानंतर नागपूरच्या दै. `सकाळ`मध्ये वामनदादांना श्रद्धांजली वाहिली. बाकीचे लेखन मी त्यानंतरच्या काळात केले. या पुस्तकात महान गीतकार या नात्याने वामनदादांच्या गीतांचा विचार मी केला आहे. त्यानिमित्ताने काही निराळे मुद्दे प्रथमच इथे विचारात घेतले आहेत. दादांच्या हिंदी गीतांचाही स्वतंत्रपणे विचार करायचा मानस आहे.प्रशांत मोरे, रविचंद्र हडसकर, पवन भगत, प्रा. सुधीर भगत, पुंजाराम गिमेकर यांनी दादांची गीते पाठविली त्याबद्दल सर्वांप्रती मी हार्दिक कृतज्ञता व्यक्त करतो. या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि संगणकीय जुळवणी करून दिल्याबद्दल मी चित्रकार भाऊ दांदडे यांचे तसेच पुस्तकाचे सुबक मुद्रण तातडीने करून दिल्याबद्दल निखिल एण्टरप्राईजेसचे आभार मानतो.या पुस्तकातील काही लेख वेगवेगळ्या निमित्तांनी लिहिले गेल्याने गीतांच्या ओळींच्या आणि क्वचित विवेचनाच्या पुनरावृत्तीबद्दल क्षमस्व । युगसाक्षी प्रकाशनाने हे पुस्तक अगत्याने प्रकाशित केल्याबद्दल माझे मित्र धनराज हनवते यांना धन्यवाद देतो.
-डॉ. यशवंत मनोहर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : आंबेडकरवादी महागीतकार वामनदादा कर्डक