शब्द... कधी इस्तवा सारखे चटके देऊन वास्तवाचे भान देणारे, जुलूमाच्या बेडयांना वितळवून स्वातंत्र्याची स्वैर वाट शोधणारे... मखमली नात्यांची वीण घट्ट ओवून मनाच्या गर्भात आठवून साठवून ठेवणारे ..... चातकाच्या बारामाही तपाची एकाच गंधित थेंबानं तहान भागवणारे.... शब्द विषाची, शब्द क्रोधाची, शब्द मोहाची, शब्द रखरखत्या उन्हांची सावली, शब्द लेकराला कुशीत जपणारी मायाळू मावळी....ह्या शब्दाची जादू समजायला तो दीड दिवस शाळेत जातो, शब्दांची जोड फोड शिकताशिकता मानवतेच्या बुद्धाशी आपली नाळ जोडतो. आयुष्याच्या प्रवासातला प्रत्येक गोड कडू क्षण, मनाच्या काहूरातला सुप्त विद्रोह शब्द रुपानं या व्यवहारी जगाच्या समोर मांडतो तो, लोकशाहीर..!! साहित्यरत्न अण्णाभाऊ आयुष्याच्या संघर्षानं जसा पिंजला तसाच पुस्तकांच्या राशीत ही विखुरला होता. त्यांचा हा जीवन पट पहिल्यांदा सिद्धार्थ ने एकाच पुस्तकात गुंफला, हे भल्या भल्यासाठी जोखमेचं आणि धाडसाचं काम होतं पण इतक्या सहज मुद्देसूद शब्दात अण्णांना परत जिवंत केलंय. जिथे अण्णा आपली व्यथा सांगतात तिथंच जिंकण्याचा मंत्र देतात.. हे सगळं एकवटून आणने त्यासाठी प्रदीर्घ अभ्यास आणि त्यासोबत संवेदशील मन सोबतीला हवं असतं, ते ह्या परखड भाष्य करणाऱ्या लेखकाच्या विचारात आणि अभ्यासात आहे, ते जशास तसं पुस्तकात दिसतं म्हणून पुस्तकाचा प्रत्येक शब्द तुमच्याशी सविस्तर संवाद साधतो, अणांच्या जवळ तुम्हाला घेऊन जातो ... संक्षिप्त, असूनही अण्णांच्या प्रदीर्घ प्रवासाची व संघर्षाची जाण लेखक आत्मीयतेने मांडतो, म्हणून हे पुस्तक वाचलं की बेचैन करतं, जगायला शिकवतं, बाबासाहेबांच्या मार्गाला व बुद्धांच्या मानवतेला नकळत स्पर्श करतं..... आणि वाचक स्वतः अण्णा होऊन नवनिर्मितीच्या क्रांतीची ज्योत धगधगत्या आत्मविश्वासाने पेटवतो, हे सामर्थ्य ह्या शब्दात गवसतं...! लेखकाच्या लेखणीला अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा !!
- बबन कंकर अडागळे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीकोनातून