डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचा लढा देत असतानाच त्याचबरोबर महाराष्ट्रातील महारांची व इतर कनिष्ठ वतनदार गावकामगारांची वतनी गुलामगिरी नष्ट करण्यासाठीही ते झगडत होते. त्यासाठी त्यांनी, ते मुंबईप्रांत कायदे कौन्सिलाचे मेंबर असताना १९२७-२८ साली महारवतन पद्धती नष्ट करण्याचे बिल कौन्सिलमध्ये मांडलेले होते. पण ते त्या वेळी पास होऊ शकले नाही. त्यानंतर त्यांनी मुंबई राज्याच्या गव्हर्नरलाही महार वतन पद्धती का नष्ट करावी? अशा स्वरूपाचा एक सविस्तर खलिताही दिलेला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रात जिल्ह्या-जिल्ह्यात महार-वतन पद्धती नष्ट करावी म्हणून परिषदाही भरत. या आघाडीवर सतत चळवळ चालू होती. पण महारवतन पद्धती नष्ट होऊ शकली नाही व महाराष्ट्रातला महार समाज व इतर कनिष्ठ वतनदार वतनी गुलामगिरीतून मुक्त झाले नाही. - महाराष्ट्रात श्री. यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री म्हणून आल्यावर मात्र त्यांनी कनिष्ठ गावकामगारांची वतन पद्धती नष्ट करणारा कायदा १९५८-५९ साली पास केला. त्यामुळेच विसाव्या शतकातील महारवतनी गुलामगिरीतून गावकामगार-महार वतनदार मुक्त झाला. माझ्या गावच्या वतनदार गावकामगार महारांनी तर तो मुक्तिदिन म्हणून साजरा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या आघाडीवर प्रारंभी दिलेल्या सतत लढ्यामुळेच ही महार-वतनी गुलामगिरी नष्ट झाली हे उघडच होते.
- तराळ-अंतराळ, शंकरराव खरात पृ. ४४८
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : महार आणि त्यांचे वतन