माणसाला इतर प्राण्यांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली करणारे जे काही घटक आहेत, त्यांमध्ये भाषा हा अत्यंत प्रभावी व महत्त्वाचा घटक आहे. ज्या व्यक्तीला भाषेच्या माध्यमातून आपल्या अनुभवांचा आविष्कार अधिक चांगल्या रीतीने करता येतो, त्या व्यक्तीचा विकास इतरांच्या तुलनेत सामान्यतः अधिक प्रमाणात होतो. एकविसाव्या शतकात जगताना आणि विज्ञानाच्या युगात वावरतानाही भाषेचे हे महत्त्व अबाधित आहे आणि पुढेही ते तसेच राहणार आहे. ज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयाचे अध्ययन करायचे असले, तरी त्या विषयाचे नीट आकलन होण्यासाठी भाषेचे उच्च दर्जाचे ज्ञान आवश्यक असते. ज्याच्याकडे भाषेतील शब्दांचे भांडार अधिक, तो ज्ञानाच्या बाबतीतही अधिक श्रीमंत, अधिक धनवान, असे म्हणता येते. शिवाय, एखाद्या विषयाचे अत्यंत सूक्ष्म असे विश्लेषण करण्यासाठी, त्याचे बारकावे कळण्यासाठी भाषेचे अनेक अंगांनी ज्ञान असणे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.विषयाचे आकलन होण्यासाठी जसे भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, तसेच आपले अनुभव, विचार इत्यादी गोष्टी इतरांपर्यंत प्रभावीरीत्या पोचवण्यासाठीदेखील एखादी का होईना भाषा उत्तम रीतीने अवगत असणे आवश्यक आहे.प्रत्येक मराठी व्यक्तीला मातृभाषा म्हणून मराठी उत्तम यायलाच हवी. राष्ट्रभाषा हिंदीचे ज्ञानही आवश्यकच. शिवाय, नव्या युगात इंग्रजीचे ज्ञान असल्याशिवाय प्रगतीचे एक पाऊलही धड टाकता येणार नाही. या भाषांच्या जोडीने विज्ञान, गणित इत्यादी अनेक विषय शिकायचे. शिवाय, आता माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात संगणक वगैरेचे ज्ञानही अत्यावश्यक. एका दृष्टीने या सगळ्यांचे ओझे गैरवाजवी प्रमाणात मुलांवर टाकले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. अर्थात, या सगळ्यांचे ओझे वाटू न देता मुलांना हे सगळे मिळवता यावे, शिक्षणाची प्रक्रिया ताणतणावाची न होता आनंदाची व्हावी, यासाठी अध्यापनाच्या पद्धती काळजीपूर्वक विकसित करणे, ही आपली एक महत्त्वाची जबाबदारी आहे.
-आ. ह. साळुंखे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : बहुजनांसाठी जीवनबादी सुभाषिते